गोंदियाविदर्भ

किशोरवयीन मुला-मुलींसाठी ‘मैत्री (अर्श) क्लिनिक’ ठरतोय आधार: तीन वर्षांत ९९१८ जणांनी घेतला लाभ

जिल्ह्यात तीन ठिकाणी मोफत समुपदेशन ; शारीरिक, मानसिक आणि लैंगिक आरोग्यावर शास्त्रीय मार्गदर्शन

गोंदिया : मानवी जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या किशोरवयीन अवस्थेत (१० ते १९ वर्षे) भेडसावणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक समस्यांवर शास्त्रीय दृष्टिकोनातून समुपदेशन करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात ‘राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना’ (NRHM) अंतर्गत सुरू झालेले मैत्री (अर्श) क्लिनिक मोठा आधार ठरत आहेत. गेल्या तीन वर्षांत तब्बल ९,९१८ किशोरवयीन मुला-मुलींनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात तीन ठिकाणी हे क्लिनिक सुरू आहेत: के.टी.एस. सामान्य रुग्णालय (दालन क्र. १२७), बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, तिरोडा

जिल्हा रुग्णालयात हे क्लिनिक दररोज सकाळी ९:३० ते १२:३० या वेळेत सुरू असते. वर्ष २०२४-२०२५ मध्ये ओपीडी: ३८२७, वर्ष २०२३-२०२४ मध्ये ओपीडी: ३६६१, वर्ष २०२२-२०२३ मध्ये ओपीडी: २४३०

‘अर्श’ कार्यक्रम समन्वयक सपना ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लिनिकमध्ये येणाऱ्या मुला-मुलींना शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक आरोग्य, आहार, सिकलसेल, तंबाखू विरोधी मोहीम आणि अवयवदान अशा विविध विषयांवर मार्गदर्शन व समुपदेशन केले जाते. गेल्या तीन वर्षांत शाळा, कॉलेज आणि महाविद्यालयांमध्ये ४२ बाह्यसंपर्क कार्यक्रम (Outreach Activities) आयोजित करण्यात आले. क्लिनिकमध्ये येणाऱ्या मुला-मुलींची सर्व माहिती गोपनीय ठेवण्यात येते.

अर्श (ARSH) कार्यक्रमाची उद्दिष्ट्ये

‘प्रजनन व बाल आरोग्य टप्पा दोन’ (RCH II) अंतर्गत सुरू झालेल्या या कार्यक्रमाची उद्दिष्ट्ये व्यापक आहेत: किशोरवयीन मुलांना त्यांच्या आरोग्याबद्दल माहिती देऊन जबाबदारीने निर्णय घेण्यासाठी सक्षम करणे. किशोरवयीन वयातील लैंगिक आणि प्रजनन आरोग्य, मानसिक आरोग्य, मासिक पाळी स्वच्छता (SHP) आणि पोषक आहार यावर वैद्यकीय तपासणी, उपचार व समुपदेशन पुरवणे. केवळ लैंगिक आरोग्यापुरते मर्यादित न राहता, पदार्थ दुरुपयोग (Substance Abuse) आणि अहिंसा व इजा प्रतिबंधावर लक्ष केंद्रित करणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button