
पुन्हा विक्री केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा
गडचिरोली : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या भामरागड शहरात पोलिस विभागाने मोहीम राबवित जवळपास 5 हजारांचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त करीत नष्ट केला. सोबतच पुन्हा विक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला.
तंबाखूजन्य पदार्थ व सुगंधित तंबाखूमुळे कॅन्सर या जीवघेण्या आजाराचा धोका बळावतो. कायद्याने बंदी असूनही पाणठेला व किराणा दुकानातून या पदार्थांची विक्री होते. लहान लहान मुलांना खर्रा तंबाखूचे व्यसन लागून आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. अशातच मुक्तीपथ तालुका समितीच्या बैठकीत तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. त्याअनुषंगाने पोलिस विभागाने शहरात मोहीम राबवली. तंबाखू विक्री होणाऱ्या पाणठेले व किराणा दुकानात धाड टाकून, तपासणी केली असता जवळपास 5 हजार रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. संपूर्ण मुद्देमाल जप्त करून होळी करण्यात आली. तसेच शहरातील 10 विक्रेत्यांना पोलिस स्टेशनला बोलावून तंबाखूजन्य पदार्थ विक्री विरोधी असलेले कायदे पटवून देण्यात आले. सोबतच पुन्हा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर मार्गाने कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी पोलिस अधिकारी, कर्मचारी व मुक्तीपथ तालुका संघटिका नीळा किन्नाके उपस्थित होते.



