
गरोदर माता, बालकांशी संवाद साधून आरोग्य सेवांचा घेतला आढावा; गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचे निर्देश
गोंदिया : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एम. मुरुगानंथंम यांनी शुक्रवार, २५ जुलै रोजी गोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा अंतर्गत येणाऱ्या आयुष्मान आरोग्य मंदिर, मुंडीपार येथे आकस्मिक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी आरोग्य संस्थेत दिल्या जाणाऱ्या सेवा व सुविधांची पाहणी केली, तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून आरोग्य व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
सीईओ मुरुगानंथंम यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता, बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) दरम्यान मिळत असलेल्या सुविधा, क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या नियमित गावनिहाय भेटींचे नियोजन, पर्यवेक्षकांनी उपकेंद्रांना दिलेल्या भेटी, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा आणि औषधी साठा यासह विविध बाबींची पाहणी केली. त्यांनी रुग्ण सुविधा गुणवत्तापूर्वक देण्याचे, सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करण्याचे आणि आरोग्य संस्थांचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्याचे निर्देश दिले.
समुदाय आरोग्य अधिकारी मनीष कटरे यांच्याकडून सुरू असलेल्या ओपीडीबाबत आणि हिमोग्लोबिन रक्त तपासणी मशीनबद्दल माहिती घेतली. आरोग्य सेविका अर्चना बोरकर यांच्याशी कार्यक्षेत्रात दिल्या जाणाऱ्या नियमित लसीकरणाविषयी माहिती घेऊन, लसीकरण नोंदवहीची पाहणी केली. गावातील बालकांना भेट देऊन लसीकरण कार्डची तपासणी केली आणि कोणताही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. दुसऱ्या आरोग्य सेविका मीना मळकाम यांच्याशी गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या सेवांविषयी माहिती घेऊन, गावातील गरोदर मातेला भेटून संवाद साधला आणि आरोग्य सेवेची पडताळणी केली. आरोग्य सेवक अभिजित तावाडे यांच्याकडून कार्यक्षेत्रातील रक्त नमुने, हिवताप बाधित रुग्ण आणि कंटेनर सर्वेक्षणाची माहिती घेतली. त्यांच्याकडील गोळा केलेल्या रक्त नमुन्यांच्या रजिस्टरची पाहणी करून दर महिन्याला कार्यक्षेत्रात गृहभेटी करून कमीत कमी १०० रक्त नमुने घेण्याच्या सूचना दिल्या.
भेटीदरम्यान, सीईओ एम. मुरुगानंथंम यांनी मुंडीपार क्र. १ अंगणवाडीला भेट देऊन कार्यक्षेत्रात असलेल्या सॅम (SAM – Severe Acute Malnutrition) आणि मॅम (MAM – Moderate Acute Malnutrition) बालकांची माहिती घेतली. अंगणवाडीमध्ये दिल्या जाणाऱ्या आहाराबाबतही चौकशी केली. एकंदरीत, पावसाळ्यात साथरोग उद्भवणार नाहीत या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि दैनंदिन गृहभेटी सर्वेक्षण करण्याच्या सूचना सीईओ एम. मुरुगानंथंम यांनी दिल्या.



