गोंदियाविदर्भ

‘स्टॉप टीबी’चे डॉ. रॉबर्ट स्टीफन यांच्याकडून गोंदियात क्षयरोग कामाकाजाची पाहणी

धानोरी ग्रामपंचायत, मालीजुंगा आयुष्मान आरोग्य मंदिर व सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयाला भेट; ‘क्षयरोगमुक्त भारत २०३०‘ अभियानाची घेतली माहिती

गोंदिया: जिनेव्हा, स्वित्झरलँड येथील जागतिक स्तरावर क्षयरोगावर काम करणाऱ्या “स्टॉप टीबी” संस्थेचे डॉ. रॉबर्ट स्टीफन यांनी दि. १४ ऑक्टोबर रोजी गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात भेट देऊन गावपातळीवर क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या कामकाजाची सखोल पाहणी केली. “आशाकल्प प्रकल्प” चे संचालक दीपक जोशी हे यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते.

डॉ. स्टीफन यांनी ग्रामपंचायत धानोरी, प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर, मालीजुंगा आणि ग्रामीण रुग्णालय, सडक अर्जुनी या ठिकाणी भेट देऊन स्थानिक पातळीवरच्या कामाचा आढावा घेतला. ग्रामपंचायत धानोरी येथे ‘निक्षय शिबिरा’ दरम्यान आयोजित केलेल्या मोफत एक्स-रे शिबिराची त्यांनी पाहणी केली. सरपंच चेतनबाई पटले यांच्याशी संवाद साधून क्षयरोगी रुग्णांना दिल्या जात असलेल्या उपचारांची माहिती घेतली. आयुष्मान आरोग्य मंदिर, मालीजुंगा येथे त्यांनी आरोग्य कर्मचारी आणि आशासेविकांशी संवाद साधून क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबद्दल चर्चा केली. दुपारच्या सत्रात ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे त्यांनी प्रयोगशाळेतील अत्याधुनिक सिबीनेट (CBNAAT) व ट्रुनेट (TrueNat) मशिनरीची पाहणी केली आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

“स्टॉप टीबी” आणि “आशाकल्प” प्रकल्प या दोन्ही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ‘प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत कार्यक्रमा’ला अर्थसहाय्य पुरवले जात आहे. २०३० पर्यंत भारताला क्षयरोगमुक्त करणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

या भेटीमुळे क्षयरोग निदान, दर्जेदार औषधे, वेळेवर उपचार आणि जनजागृती मोहिमांसारख्या विविध बाबींवर गावपातळीवर अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी नवी ऊर्जा मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button