
गडचिरोली : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्ह्यात ‘स्वबळ’ चाचपणी सुरू केल्याचे चित्र आहे. ‘जनकल्याण यात्रे’च्या माध्यमातून त्यांनी पक्षाची स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू केली असून, या निमित्ताने ते आपले राजकीय बळ आजमावत आहेत. १२ ऑक्टोबर रोजी चामोर्शी येथे झालेल्या पहिल्या सभेनंतर, आता २६ ऑक्टोबर रोजी तालुका क्रीडा मैदान देसाईगंज (वडसा) येथे १२ वाजता जनकल्याण यात्रेची दुसरी सभा आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपद, नगराध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण जाहीर होताच, आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्या राजकीय हालचालींना वेग दिला आहे. त्यांनी यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे सुतोवाच केले होते. त्यातच १० ऑक्टोबर रोजी त्यांनी सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्यावर निशाणा साधल्याने ते चर्चेत आले होते. या पार्श्वभूमीवर, महायुतीत असले तरी जिल्ह्यात स्वतःची स्वतंत्र पकड मजबूत करण्याचा आणि स्वबळाची चाचपणी करण्याचा आत्राम यांचा प्रयत्न या यात्रेतून स्पष्टपणे दिसून येत आहे.
याच रणनीतीचा भाग म्हणून, १२ ऑक्टोबर रोजी चामोर्शी येथे ‘जनकल्याण यात्रे’ची भव्य सभा पार पडली. या सभेला आमदार तथा पक्षाचे वक्ते अमोल मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजप, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष) व काँग्रेसचा प्रभाव असलेल्या चामोर्शीत सभा घेऊन आत्राम यांनी आपले शक्तिप्रदर्शन केले.
चामोर्शीतील सभेनंतर आता सर्वांचे लक्ष २६ ऑक्टोबर रोजी देसाईगंज येथे होणाऱ्या दुसऱ्या सभेकडे लागले आहे. सभेला जिल्ह्यातील वरिष्ठ व आजी माजी पदाधिकारी व सिनेअभिनेत्री माधुरी पवार ह्यांची उपस्थिती असणार आहे. या सभांच्या माध्यमातून धर्मरावबाबा आत्राम हे आपली आगामी राजकीय रणनीती अधिक स्पष्ट करतील आणि स्वबळाचा नारा बुलंद करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.



