चंद्रपूरविदर्भ

अडीच महिन्याच्या मुलीसह मातेचा आत्महत्येचा प्रयत्न

सामाजिक कार्यकर्त्यांच्या समयसूचकतेमुळे वाचला महिलेचा जीव

वरोरा: क्षुल्लक कारणामुळे पतीने केलेल्या मारहाणीला कंटाळून चिमूर तालुक्यातील खडसंगी येथील एका महिलेने आपल्या अडीच महिन्याच्या मुलीसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वरोरा येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या समयसूचकतेमुळे या महिलेचा आणि तिच्या चिमुकलीचा जीव वाचवण्यात यश आले आहे. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत पतीला समजावून सांगितले.

दि. २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही महिला आपल्या अडीच महिन्याच्या मुलीसह वरोरा येथील रत्नमाला चौकात उतरली. त्यानंतर ती थेट रेल्वे रुळाकडे मार्गक्रमण करू लागल्याने तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. सामाजिक कार्यकर्ते रमेश सनस, राहुल शेंडे, अमोल सेलकर यांच्या हे निदर्शनास आले. त्यांनी महिलेला गाठून तिची विचारपूस केली. पतीने क्षुल्लक कारणावरून मारहाण केल्यामुळे आत्महत्या करण्यासाठी जात असल्याचे तिने सांगितले. राहुल शेंडे यांच्या आईने या महिलेची समजूत काढून तिला रात्रभर आपल्या घरी मुक्कामी ठेवले.

या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी छोटूभाई शेख यांच्यामार्फत वरोरा पोलिसांना (पीएसआय म्हस्के) दिली. याच दरम्यान, पत्नीच्या शोधात असलेला तिचा पती राहुलच्या घरी पोहोचला आणि त्याने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याची चांगली समज काढली. दुसऱ्या दिवशी दुपारी दोनच्या सुमारास महिलेचे वडील व भाऊ कोरपना पारडी येथून वरोरा येथे पोहोचले. पोलीस उपनिरीक्षक म्हस्के यांनी पतीला समज देऊन, महिलेला काही दिवसांसाठी वडिलांसोबत माहेरी पाठवण्याचा निर्णय घेतला. यावेळी छोटूभाई शेख, गोपाळ गुडधे, प्रविण गंधारे आदी उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्त्यांच्या या वेळीच दाखवलेल्या तत्परतेमुळे एक महिला आणि तिच्या चिमुकलीचे प्राण वाचले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button