
नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
गोंदिया/नागपूर: मासेमारी उत्पादित मासे खरेदी-विक्री कराराच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी एका सहायक निबंधकाने तक्रारदाराकडे चक्क एक लाख रुपये लाचेची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लाच स्वीकारण्यास संशय आल्याने आरोपीने अंतिम लाच स्वीकारली नाही, मात्र पदाचा दुरुपयोग करून लाचेची मागणी केल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक निबंधकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार यांचा मासेमारीचा व्यवसाय आहे. त्यांनी ‘ईटीयाडोह जलाशय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्या., रामनगर’ या संस्थेशी २०२३ ते २०२७ या कालावधीसाठी मासे खरेदी-विक्रीचा करार केला होता. संस्थेने काही कारणास्तव हा करार मुदतपूर्व रद्द केला. याबाबत तक्रारदारांनी सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध व मत्स्य), भंडारा यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीवर चौकशी करण्यासाठी गोंदिया सहकारी संस्थेचे सहायक निबंधक सुदाम लक्ष्मण रोकडे (वय ५६) यांनी तक्रारदाराकडे ₹१,००,०००/- लाचेची मागणी केली. लाच मागणीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूरच्या पथकाने दि. ०९/१०/२०२५, दि. १६/१०/२०२५ आणि दि. २७/१०/२०२५ रोजी सापळा पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान रोकडे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी पहिल्या हप्त्यापोटी ₹२५,०००/- पैकी ₹२२,०००/- लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती. २८ ऑक्टोबर रोजी लाचेचा सापळा रचला असता, संशय आल्याने आरोपी सुदाम रोकडे यांनी मागणी केल्याप्रमाणे लाच रक्कम स्वीकारली नाही.
सुदाम रोकडे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लाच रकमेची मागणी केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गोंदिया शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (संशोधन-२०१८) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर, विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.



