गोंदियाविदर्भ

केटीएस रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग‘ संकल्पना ; अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली अवयवदान व नेत्रदानाची शपथ

गोंदिया : राष्ट्रीय आरोग्य अभियान, के.टी.एस. सामान्य रुग्णालय, आयुष विभाग आणि जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने आज, शनिवार, २१ जून रोजी केटीएस सामान्य रुग्णालय परिसरात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे ब्रीदवाक्य “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी यावेळी माहिती दिली. या संकल्पनेचे विश्लेषण करताना त्यांनी सांगितले की, वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांसाठी आनंदी आणि निरोगी भविष्य सुरक्षित करण्यासाठी जगाने एकत्र येणे महत्त्वाचे आहे, हे या थिमद्वारे बोधित होते.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती जयस्वाल, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पवन राऊत, जिल्हा मौखिक अधिकारी डॉ. अनिल आटे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मीना वट्टी, जिल्हा आय.पी.एच.एस. अधिकारी डॉ. स्वर्णरेखा उपाध्याय, योग प्रशिक्षक राजेश चुटे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे, जिल्हा आय.ई.सी. अधिकारी प्रशांत खरात, आरबीएसके कार्यक्रमाचे संजय बिसेन आणि भौतिकोपचार तज्ञ डॉ. कांचन भोयर उपस्थित होते.

योग दिनाचे औचित्य साधून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांच्या कल्पक विचारातून सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अवयवदान व नेत्रदानाची शपथ घेऊन संकल्प केला. या वेळी केटीएस रुग्णालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.

सदर योग दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी सर्वात प्रथम आरोग्य देवता धन्वंतरी मातेचे पूजन करण्यात आले व योग आचरणाचा संकल्प जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मीना वट्टी यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला. यावेळी योग प्रशिक्षक राजेश चुटे यांनी योगाचे विविध प्रकारांचे प्रात्यक्षिक व त्याचे महत्त्व पटवून सांगितले, तसेच त्याची जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यामध्ये सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र व आयुष दवाखान्यांमध्ये योगशिक्षकांमार्फत योगाचे धडे दिले जातात, त्याचा लाभ सामान्य जनतेने घ्यावा असे आवाहन जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मीना वट्टी यांनी लोकांना केले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी सांगितले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात मानवाने आपली जीवनशैलीच बदलून टाकली आहे. कामाचा व्याप, कौटुंबिक जबाबदारी, वेळेचा अभाव आणि इतर विविध बाबींमुळे दिवसभर ऑफिसची कामे, मोबाईल व व्हॉट्सॲपचा वापर, अनियमित जेवणाची वेळ, उशिरा झोपण्याची सवय, फास्ट व जंक फूड खाणे, व्यायाम व चालण्याचा अभाव, मानसिक ताणतणाव, चिंता, धुम्रपान, दारू व इतर नशा व्यसन यांसारख्या सवयींचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यावर मात करण्यासाठी आपली भारताची प्राचीन योग विद्या अवलंबविणे ही काळाची गरज बनली आहे. मनाला व शरीराला आरोग्यमय ठेवायचे असेल, तर नियमित योग करणे हा स्वस्त व सोपा उपाय आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी या प्रसंगी सांगितले की, जीवनशैलीतील बदलांमुळे हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलपणा, थायरॉईड वृद्धी, कर्करोग, मेंदूचे विकार, सांध्याचे विकार, मानसिक आजार अशा विविध आजारांचे माहेरघर झाले आहे. योगशास्त्र ही भारतीयांची जगाला दिलेली देणगी आहे. सध्याच्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेले अनेक आजार योग करण्यामुळे कमी होऊ शकतात. योगाच्या दैनंदिन आचरणामुळे निरोगी राहण्यास मदत होते, तसेच रोगमुक्त होण्यामध्ये मदत होऊन सकारात्मक ऊर्जा कायम राहते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगा व संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.

योगसत्र कार्यक्रमाला आरोग्य विभाग, केटीएस रुग्णालयाचे अधिकारी व समन्वयक यांच्यासह आयुष विभागाचे योग प्रशिक्षक राजेश चुटे, ममता कानफाडे, डॉ. गायत्री धाबेकर, डॉ. ममता पिढेकर, डॉ. शाहिन खान, डॉ. महिंद्रा संग्रामे, डॉ. नीलिमा कुथे, डॉ. नाहीद कौसर, स्वप्ना खंडाईत, अँड. रेखा सपाटे, स्वाती पाटील, भाविका बघेले, बबिता शिवणकर, सुनंदा रामटेके, डॉ. अर्चना चव्हाण, अनिवृद्ध शर्मा, कमलेश चाटके, ललित शेंडे व रुखसाना शेख यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button