पुष्कर कुंभमेळ्यासाठी खर्च केलेला कोट्यावधींचा निधी पाण्यात
व्हीआयपी केबिन आणि पर्यटन प्रेक्षक तळाचे शेड झाले बेवारस

सिरोंचा : एप्रिल २०२२ मध्ये सिरोंचा येथे भरलेल्या पुष्कर कुंभमेळासाठी निर्माण करण्यात आलेल्या सुविधा आता विनावापर पडून असल्याने शासनाने खर्च केलेला कोट्यावधी रुपयांचा निधी पाण्यात गेला असल्याचे दिसुन येत आहे. मात्र तत्कालीन स्थितीत करण्यात आलेल्या सुविधांच्या देखभाल दुरुस्तीकडे स्थानीक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
दर १२ वर्षांनी कुंभमेळा भरत असतो. कुंभमेळासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले होते. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाजित १० कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले होते तर सिरोंचा नगरपंचायत कडून अंदाजित २५ लाखांच्या निधीचे नियोजन करण्यात आल होते. सिरोंचा नगरपंचायतीच्या वतीने पिण्याचे पाणी, स्वच्छता, विद्युत आणि शौचालय साफ करण्यासाठी सेप्टिक टैंक आदी सुविधा निर्माण करण्यासाठी खर्च करण्यात आला होता.
सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाजे दहा कोटी रुपयांचे नियोजन यात्रेसाठी केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भाविकांना नदी घाटापर्यंत जाण्यासाठी मार्ग, रस्त्याच्या बाजूने चालण्यासाठी पार्किंग टाइल्स, पार्किंग व्यवस्था, सहा ते सात व्हीआयपी केबिन त्यामध्ये एसी शौचालय, स्त्रियांसाठी स्नानगृह, शॉवर, पुरुषांसाठी स्नानगृह, नागरीकांना थांबण्यासाठी अथवा कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूम, टिनाचे शेड, सेल्फी पॉईंट, पिंड प्रदान करण्यासाठी, पर्यटन प्रेक्षक स्थळ शेड, जिकडेतिकडे नळाच्या पाण्याच्या टाक्या अशा अनेक कामांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र व्हीआयपी केबिन, शौचालय, टिनाचे शेड आता बिनकामाचे वाऱ्यावर पडून आहेत. काही काही चोरीला गेले असावेत. याकडे नियंत्रण कोणाचे हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.
पुष्कर मेळाव्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या सुविधा आता धुळखात पडल्या आहेत. सिरोंचा शहरात अनेक ठिकाणी मुलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे नरगपंचायतीने पुष्कर मेळाव्यासाठी उभारण्यात आलेल्या विविध वस्तुंचा शहरातील अनेक वार्डातील नागरीकांच्या वापरासाठी उपयोग करावा अशी मागणी नागरीकातून केली जात आहे.



