क्राईमगडचिरोलीविदर्भ

ट्रॅक्टरमधून अवैध डिझेलची वाहतूक ; १५९९ लिटर डिझेलसह ७.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

एका आरोपीला अटक ; आष्टी पोलिसांची धडक कारवाई

गडचिरोली : गांधीनगर परिसरातून ट्रॅक्टरमधून अवैध डिझेलची वाहतूक करणाऱ्या एकावर आष्टी पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १५९९ लिटर डिझेलसह सुमारे ७ लाख ५८ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. किशोर विश्वजीत बिश्वास (रा. देवजगर, ता. मुलचेरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

३१ मे रोजी आष्टी पोलीस ठाण्याचे पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी गांधीनगरकडून आनंदग्राम मार्गे मुलचेराच्या दिशेने एक विना क्रमांकाचे ट्रॅक्टर संशयास्पद स्थितीत येताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी तत्काळ ट्रॅक्टर थांबवून चालकाची विचारपूस केली. चालकाने आपले नाव किशोर बिश्वास असल्याचे सांगितले.

पोलिसांनी ट्रॅक्टरची झडती घेतली असता, त्यात डिझेलने भरलेले ड्रम्स आणि बॅरेल आढळून आले. यात ४०० लिटर डिझेल (किंमत ३९,७२० रुपये) आणि ११९९ लिटर डिझेल (किंमत १,१९,०६० रुपये) असा एकूण १,५८,७८० रुपयांचा अवैध डिझेल साठा होता. डिझेल वाहतुकीबाबत चालकाकडे कोणताही परवाना किंवा कायदेशीर कागदपत्रे नसल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी डिझेलसह ६ लाख रुपये किमतीचे विना क्रमांकाचे जॉन डीअर कंपनीचे ट्रॅक्टर व ट्रॉली असा एकूण ७,५८,७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी आष्टी पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३, ७ अन्वये गुन्हा दाखल केला असून, आरोपी किशोर बिश्वास यास अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल काळे हे करीत आहेत.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) हर्षवर्धन बी.जे. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (अहेरी) अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल काळे, पोउपनि. गोकुलदास मेश्राम व आष्टी पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button