
देशाच्या अखंडतेचा संदेश देण्यासाठी भाजपातर्फे एकात्मता धाव ; माजी आ. डॉ. नामदेवराव उसेंडी यांची उपस्थिती
गडचिरोली : देशाचे अखंडतेचे प्रतीक, लोहपुरुष आणि भारताचे पहिले गृहमंत्री स्वर्गीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी (भाजपा) गडचिरोली शहर व ग्रामीण यांच्यातर्फे ‘रन फॉर युनिटी’ (Run for Unity) या एकात्मता धावचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या मॅरेथॉनच्या माध्यमातून सरदार पटेल यांच्या कार्याचा वारसा आणि देशभक्तीची भावना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली.
या कार्यक्रमात शहरातील नागरिक, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर यांच्यासह ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहणकर, अनिल तिडके, मुक्तेश्वर काटवे आणि गीता हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी आ. डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी सरदार पटेल यांच्या कार्याचा गौरव करत, “एकात्मतेचा, देशभक्तीचा आणि एकजुटीचा हा संदेश प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कायम जिवंत राहो,” अशी भावना व्यक्त केली.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील असंख्य संस्थानांचे एकत्रीकरण करून अखंड भारताची जी पायाभरणी केली, त्या महान कार्याचे स्मरण या ‘रन फॉर युनिटी’च्या माध्यमातून करण्यात आले. नगरपरिषदेचे स्वच्छता दूत, विद्यार्थी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते.



