गडचिरोलीविदर्भ

एटापल्ली नगर पंचायतीवर भाजपचा झेंडा

रेखा मोहुर्ले नगराध्यक्षपदी विराजमान

एटापल्ली : स्थानिक नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत अखेर भारतीय जनता पार्टीने (भाजप) विजय मिळवत सत्तांतर घडवून आणले आहे. भाजपच्या उमेदवार रेखा मोहुर्ले यांनी काँग्रेसच्या दीपयंती पेंदाम यांचा पराभव करून नगराध्यक्षपद पटकावले. विशेष म्हणजे, भाजपचे केवळ तीन नगरसेवक असतानाही ही निवडणूक जिंकणे, हा मोठा राजकीय विजय मानला जात आहे.

एटापल्ली नगर पंचायतीत रेखा मोहुर्ले यांना विविध पक्षांच्या सदस्यांनी पाठिंबा दिला. रेखा मोहुर्ले यांना एकूण ११ मते मिळाली, तर दीपयंती पेंदाम यांना ६ मतांवर समाधान मानावे लागले. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा पाठिंबा मिळवून ही निवडणूक जिंकली. हात उंचावून मतदान घेण्यात आले.

विजयी झाल्यानंतर नवनियुक्त नगराध्यक्ष रेखा मोहुर्ले यांनी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची भेट घेतली. आमदार आत्राम त्यावेळी भगवंतराव महाविद्यालयातील कार्यकर्त्यांच्या बैठकीस उपस्थित होते. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी शहरात भव्य विजय रॅली काढली.

या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून एसडीओ अमर राऊत यांनी काम पाहिले, तर मुख्याधिकारी प्रणय तांबे उपस्थित होते. एसडीपीओ चेतन कदम व ठाणेदार मच्छिंद्र नागरगोझे यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button