गडचिरोलीगोंदियामहाराष्ट्रमुंबईविदर्भ

राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकीचे वाजले बिगुल!

निवडणूक कार्यक्रम जाहीर ; २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला मतमोजणी

मुंबई : महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने मंगळवार, ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४:०० वाजता पत्रकार परिषदेत जाहीर केला. या घोषणेसोबतच संपूर्ण राज्यात निवडणूक आचारसंहिता त्वरित लागू झाली आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ सुमारे चार वर्षांपासून संपलेला असल्याने या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

वेळापत्रकानुसार, ७ नोव्हेंबर रोजी मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत नामांकन दाखल करता येईल. १८ नोव्हेंबर रोजी नामांकन पत्रे मागे घेतली जातील. २१ नोव्हेंबरपर्यंत अर्जदारांना त्यांचे अर्ज मागे घेता येतील. २ डिसेंबर रोजी मतदान होईल आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.

गोंदिया जिल्ह्यातील दोन नगरपरिषदा आणि दोन नगरपरिषदांमध्ये निवडणुका होतील. गोंदिया जिल्ह्यात गोंदिया नगरपरिषद आणि तिरोडा नगरपरिषद तसेच गोरेगाव नगर पंचायत आणि सालेकसा नगर पंचायतीचा समावेश आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील तीन नगर परिषदांमध्ये निवडणूका होतील. यामध्ये गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज (वडसा) नगर परिषदेचा समावेश आहे. या तिन्ही नगर परिषदांमध्ये भाजपची सत्ता होती. नगर परिषद देसाईगंज (वडसा) येथे डिसेंबर 2016 मध्ये शेवटची निवडणूक झाली होती. नगर परिषद गडचिरोलीची निवडणूक डिसेंबर 2016 मध्ये झाली होती. तर नगर परिषद आरमोरीची शेवटची निवडणूक 2019 मध्ये झाली.

भाजपची सत्ता असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही नगरपरिषदेत सत्ता राखण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर उभे राहणार आहे, तर गोंदिया जिल्ह्यातील चारही संस्थांमध्ये चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत. या निवडणुकीमुळे जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button