गडचिरोलीविदर्भ

धान उत्पादकांचे थकीत चुकारे आणि बोनस तातडीने द्या – माजी आ. कृष्णा गजबे

TDC कार्यालयात ‘अधिकारी-आविका पदाधिकारी/कर्मचाऱ्यांची‘ बैठक ; TDC संचालक आणि अन्नपुरवठा विभागाच्या सचिवांकडून लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन

आरमोरी : आरमोरी विधानसभा क्षेत्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत माजी आमदार कृष्णा गजबे यांनी ०४ नोव्हेंबर रोजी आरमोरी येथील आदिवासी विकास महामंडळ (TDC) कार्यालयात तातडीची बैठक घेतली. शेतकऱ्यांचे थकीत चुकारे, बोनस आणि चालू हंगामातील खरेदी प्रक्रिया त्वरित सुरू करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. बैठकीतूनच त्यांनी थेट मुंबईतील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आक्रमक भूमिका घेतली, ज्यानंतर सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन मिळाले.

आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कुरखेडा, आरमोरी, देसाईगंज आणि कोरची या चारही तालुक्यातील आदिवासी खरेदी-विक्री केंद्रांचे सभापती, व्यवस्थापक यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित होते. यावेळी कृष्णा गजबे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने बाजू मांडत त्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. त्यात धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करा, चालू हंगामातील धान खरेदी केंद्रे तात्काळ कार्यान्वित करून खरेदी प्रक्रिया सुरू करा, शेतकऱ्यांच्या नोंदणी सुरू करा, धान विक्रीसाठी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया त्वरित सुरू करा, रब्बीचे थकीत चुकारे द्या, मागील रब्बी हंगामात विक्री केलेल्या धानाचे थकीत चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करा, शासनाने जाहीर केलेला धान खरेदीचा बोनस (वनपट्टे व पट्टेधारक) शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर वर्ग करावा आदी मागण्या करण्यात आल्या.

मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क या गंभीर प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी माजी आमदार कृष्णा गजबे यांनी बैठकीतूनच थेट आदिवासी विकास महामंडळाच्या मुंबईतील वरिष्ठ अधिकारी (एम.डी., जी.एम., एम.आर.) यांच्याशी, तसेच अन्नपुरवठा विभागाचे सचिव व उपसचिव यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला.

या सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील धान खरेदी, थकीत चुकारे आणि बोनस वितरणाचे सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. माजी आमदार गजबे यांनी शेतकऱ्यांचे विकलेले धान आणि जाहीर झालेला बोनस त्वरित मिळावा यासाठी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक सोपान संबारे, उपप्रादेशिक व्यवस्थापक सोनवाने, उपप्रादेशिक व्यवस्थापक साळवे, आ.वि.का. संस्था कुरखेडाचे उपसभापती चांगदेव फाये, आंधळीचे उपसभापती विनोद खुणे, आरमोरी कृउबा समितीचे उपाध्यक्ष व्यंकट नागिलवार, धरमदास उईके, हेमंत सेंदरे, दिलीप कुमरे, तथा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे अधिकारी व कर्मचारी तथा पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button