भंडाराविदर्भ

४७३२ विद्यार्थ्यांच्या सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायनाने भारावले वातावरण!

लाखनी येथे राष्ट्रगीताच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त भव्य सोहळा; ‘राष्ट्रभक्ती केवळ शब्दात नको, कृतीत असावी’ – तहसीलदार शीतल घावटे

भंडारा : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या सार्धशताब्दी (१५० वर्षे पूर्ण) निमित्ताने भंडारा जिल्ह्यात अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. लाखनी येथील समर्थ मैदानावर शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता आयोजित केलेल्या भव्य सामूहिक गायन कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधील तब्बल ४७३२ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी एकत्रितपणे वंदे मातरम् गीताचे सुमधुर गायन केले. या देशभक्तीपर उपक्रमाने संपूर्ण परिसर भारावून गेला.

लाखनीच्या तहसीलदार शितल घावटे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी विदर्भ प्रांत कार्यकारिणी सदस्य दत्तात्रय केळकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.  यावेळी गटविकास अधिकारी एस.डी. पानतावणे, पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, ॲड. कोमलदादा गभने, गटनिर्देशक प्रशांत बेतावार, सहाय्यक प्रिया माकोडे, अर्पित गुप्ता आणि पंकज रामटेके आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’ विषयावर आधारित आकर्षक नाटिका सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. समर्थ महाविद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय, एम.डी.एन. स्कूल आणि सिद्धार्थ विद्यालय यांसह अनेक शिक्षण संस्थांचा सहभाग लक्षणीय होता. सामूहिक गायनाचे संयोजन आणि संगीत दिग्दर्शन भास्कर पिंपळे संगीत विद्यालयातील विद्यार्थिनींनी केले.

अध्यक्षीय भाषणात तहसीलदार शितल घावटे म्हणाल्या, “वंदे मातरम् हे केवळ गीत नाही, तर राष्ट्रभक्तीचा आणि मातृभूमीवरील प्रेमाचा शाश्वत संदेश देणारी प्रेरणादायी संकल्पना आहे. फक्त वंदे मातरम् म्हणून भागणार नाही, तर देशाच्या सेवेसाठी कृती करावी लागेल. आपण सर्वजण आपल्या दैनंदिन जीवनात देशप्रेमाची कृती केली, तरच भारत ‘सुजलाम् सुफलाम्’ बनेल.”

प्रमुख वक्ते दत्तात्रय केळकर म्हणाले, “वंदे मातरम् हे स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची आणि अखंड राष्ट्रभावनेची प्रेरणा आहे. हे गीत इंग्रजांच्या विरोधात राष्ट्रजागृतीचे प्रतीक ठरले होते, आणि आजही त्याच गीताच्या स्वरांतून देशभक्तीचा आवाज गुंजत आहे.”

या राष्ट्रभक्तीपर उपक्रमाला ७०० हून अधिक शिक्षक, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अजिंक्य भांडारकर, उमेश सिंघनजुडे यांच्यासह इतरांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button