
आ. मिलिंद नरोटे यांच्या निवासस्थानी चर्चा ; जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचे मंत्र्यांचे आश्वासन
गडचिरोली : राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या निवासस्थानी भेट दिली. याप्रसंगी माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील दुर्गम भागातील आरोग्य समस्यांवर सविस्तर चर्चा केली. गडचिरोलीसारख्या संवेदनशील जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी या भेटीत सकारात्मक चर्चा झाली.
डॉ. नामदेव उसेंडी यांनी आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधताना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC), ग्रामीण रुग्णालये आणि उपकेंद्रांमधील रिक्त पदे, औषध पुरवठा आणि आधुनिक उपकरणांच्या कमतरतेबाबत लक्ष वेधले. “दुर्गम भागातील शेवटच्या नागरिकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे आवश्यक आहे,” अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सर्व समस्या जाणून घेतल्यानंतर सांगितले की, “गडचिरोली जिल्ह्यासाठी शासन विशेष प्राधान्य देत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. रिक्त पदांची भरती आणि नवीन आरोग्य सुविधांबाबत लवकरच ठोस पावले उचलली जातील,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ देवराव होळी, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, मुक्तेश्वर काटवे, शिवशेना जिल्हाप्रमुख हेमंत जंबेवार, नगरसेवक शेखर आखाडे सह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या भेटीमुळे जिल्ह्यातील रखडलेल्या आरोग्य प्रश्नांना आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.



