गोंदियाविदर्भ

पॉलिसी काढण्यास नकार देणाऱ्या एजंटवर चाकूने हल्ला

साखरीटोला येथील घटना ; आरोपी पती-पत्नीवर गुन्हा दाखल

गोंदिया : सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या साखरीटोला गावात शनिवारी (दि. ७) दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास पत्नीची पॉलिसी काढण्यास नकार दिल्यामुळे तिच्या पतीने इन्शुरन्स एजंटवर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली.

तेजलाल गजानन ठाकरे (वय ४३, रा. साखरीटोला) हे इन्शुरन्स एजंट आहेत. त्यांनी २०२० मध्ये आरोपी मधुकर नत्थूलाल चौधरी (वय ४०, रा. ब्राह्मणी, आमगाव) याची पॉलिसी काढली होती. मात्र, मधुकरच्या पत्नीने वारंवार फोन करून ‘माझ्या नावाची पॉलिसी काढा’ असा आग्रह धरत ठाकरे यांना त्रास दिला. वारंवारच्या त्रासामुळे ठाकरे यांनी महिलेचा नंबर ब्लॉक केला, याचा राग मधुकर आणि त्याच्या पत्नीने मनात धरला.  संतापलेल्या मधुकर आणि त्याच्या पत्नीने तेजलाल ठाकरे यांच्या घरी जाऊन घरातील हॉलमध्येच पॉलिसीसंदर्भात वाद घातला, शिवीगाळ केली आणि धमक्या दिल्या. त्यानंतर मधुकरने चाकू काढून ठाकरे यांच्यावर हल्ला केला. तेजलाल यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आणि आरोपीचा हात पकडला. मात्र, या झटापटीत चाकू लागून त्यांच्या डाव्या हाताच्या तळहातास आणि उजव्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली.

सालेकसा पोलिसांनी आरोपी मधुकर चौधरी आणि त्याच्या पत्नीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम ११८(१), ३३३, ३५२, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नायक रामलाल राऊत करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button