
गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील घटना
गडचिरोली : कत्तलीसाठी जनावरांची तस्करी करणाऱ्या कसायाच्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या तीन गोरक्षकांवर लोखंडी रॉडने हल्ला झाल्याची गंभीर घटना ८ नोव्हेंबर रोजी पहाटे ३:४५ वाजण्याच्या सुमारास चंद्रपूर मार्गावर वायुनंदना प्लॅटजवळ घडली.
जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करत असताना हा हल्ला झाला. यामध्ये सुभाष धाईत (वय ३२, रा. पंचवटीनगर, गडचिरोली), हरीश गोविंदा माकडे (वय ३२, रा. नवेगाव), अंकुश पवार (वय २७, रा. गोकुलनगर, गडचिरोली) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत:
पोलिसांनी या घटनेनंतर वसीम कुरेशी (वय २५, रा. चंद्रपूर) याला ताब्यात घेतले आहे. १ ऑक्टोबरपासून आतापर्यंत गोरक्षकांच्या मदतीने पोलिसांनी गोतस्करी विरोधात १० कारवाया केल्या आहेत.
जिल्ह्यात वाढली गोतस्करी
गेल्या चार ते पाच महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यातून जनावरांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. छत्तीसगडमधून गडचिरोलीमार्गे तेलंगणात जनावरांची वाहतूक केली जात आहे. या अवैध व्यवसायात अनेक बडे लोक गुंतले असून, लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. या वाढत्या तस्करीत प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.



