
गडचिरोली : शासकीय रुग्णालयातील रक्ताची चणचण लक्षात घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, शाहूनगर, गडचिरोली आणि सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता गानली समाज सभागृह, गडचिरोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या पुण्यकार्यात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.
गडचिरोली सामान्य रुग्णालय हे केवळ गडचिरोली जिल्ह्यासाठीच नव्हे, तर चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, मुल, सिंदेवाही, नागभीड आणि ब्रह्मपुरी यांसारख्या लगतच्या तालुक्यांतील रुग्णांसाठीही उपचाराचे महत्त्वाचे केंद्र आहे. मानवी खानपानाच्या अयोग्य सवयी आणि वातावरणातील बदलांमुळे रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत नेहमीच रक्ताचा तुटवडा जाणवतो आणि सध्या ही चणचण अधिकच गंभीर झाली आहे.
यामुळे उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांना आणि विशेषतः सिकलसेल रुग्णांना नियमित रक्तपुरवठा करताना रुग्णांचे नातेवाईक आणि रक्तपेढीतील अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. रक्तटंचाईच्या या गंभीर समस्येचा विचार करून, रंजन बल्लमवार यांच्या संकल्पनेतून ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, शाहूनगर, गडचिरोली’ या सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली. या समाजसेवी संस्थेच्या सभासदांच्या सहकार्याने दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याची योजना आहे.
याच श्रृंखलेतील पहिले शिबिर गुरुवारी आयोजित करण्यात आले आहे. रुग्णांचे प्राण वाचवण्याच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमात नागरिकांनी स्वच्छेने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे कळकळीचे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेकडून करण्यात आले आहे.



