महाराष्ट्रमुंबई

‘ऑनलाइन अर्ज प्रक्रिया किचकट ; प्रत्यक्ष अर्ज स्वीकारावे’ – काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार

काँग्रेसची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी ; ‘अजित पवारांना सत्तेतून बाहेर काढण्याची खेळी’

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज भरण्याची ऑनलाइन प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे, उमेदवारी अर्ज ऑनलाइनसह प्रत्यक्ष (ऑफलाइन) देखील स्वीकारावेत, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त वाघमारे यांच्याकडे केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य निवडणूक आयुक्तांशी याबाबत सविस्तर चर्चा केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज तब्बल २० पानांचा असून, त्यात उमेदवाराला मागील निवडणुकीतील मतांची संख्या आणि खर्चाची माहिती मागितली आहे. ही सर्व माहिती निवडणूक आयोगाकडे पूर्वीपासून उपलब्ध असतानाही पुन्हा मागणे अनावश्यक आहे. ऑनलाइन अर्ज भरताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने शेवटच्या क्षणी विरोधकांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे अर्ज प्रत्यक्षात स्वीकारण्याची विनंती काँग्रेसने केली आहे.

यावेळी वडेट्टीवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. “पुण्याच्या जमीन घोटाळ्यात पार्थ पवार जबाबदार आहेत. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या पक्षाचा घोटाळा बाहेर काढून त्यांची कोंडी केली जात आहे.” येणाऱ्या निवडणुकीत पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा, सांगली आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अजित पवार यांच्या पक्षाने भाजप-पूरक भूमिका घ्यावी, या हेतूने त्यांना कमजोर करण्याचा डाव स्पष्ट दिसत आहे.

महायुतीत सगळ्यात पहिला आघात अजित पवार यांच्या पक्षावर होईल आणि त्यांना सत्तेतून बाहेर पडण्याची वेळ त्यांच्यावर आणली जाईल, असा थेट आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button