गडचिरोलीविदर्भ

खवय्यांसाठी पर्वणी! ; गडचिरोलीत २६ मे रोजी भव्य ‘८ वा आंबा महोत्सव’

गावरान आंबा प्रजातींचे प्रदर्शन व विक्री ; नव्या शास्त्रोक्त तंत्रज्ञानासह प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याचा मुख्य उद्देश

गडचिरोली : जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, स्थानिक गावरान आंब्यांच्या वाणांची जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी आणि आंबा पिकावर आधारित प्रक्रिया उद्योगांना मोठी चालना देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य ‘आंबा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (PDKV), अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र (KVK), सोनापूर-गडचिरोली, प्रकल्प संचालक ‘आत्मा’ आणि कृषी विभाग, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी २६ मे २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर येथे ‘८ वा आंबा महोत्सव २०२६’ चा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मिळणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मिळ गावरान आंब्यांच्या प्रजातींचे एक दिवसीय प्रदर्शन व थेट विक्री व्यवस्थापन या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे. डॉ. पं.दे.कृ.वि, अकोला चे माननीय कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या प्रेरणेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून गडचिरोलीतील आंबा लागवडीच्या शास्त्रोक्त क्षेत्रात वाढ करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

या एक दिवसीय महोत्सवात केवळ आंब्यांची खरेदी-विक्रीच होणार नसून, उपस्थित शेतकरी आणि फळबाग उत्पादकांना कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रगतशील शेतकऱ्यांकडून खालील विषयांवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभणार आहे: नवे तंत्रज्ञान: आंबा पिकाची नवीन शास्त्रोक्त फळबाग लागवड, बहार व्यवस्थापन आणि छाटणी तंत्रज्ञान. किड नियंत्रण: सेंद्रिय पीक व्यवस्थापन तसेच एकात्मिक कीड व रोग नियंत्रण पद्धती. प्रक्रिया उद्योग: फळे काढणीनंतरचे प्राथमिक व दुय्यम व्यवस्थापन आणि त्यासंबंधीचे प्रक्रिया उद्योग (लोणचे, रस निर्मिती उद्योग इ.) कसे सुरू करावेत याबद्दल मार्गदर्शन.

कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. किशोर झाडे तसेच गडचिरोलीच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) प्रिती हिरळकर यांनी जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांना संयुक्त आवाहन केले आहे.

शेतकरी बंधू-भगिनींनी आपल्या परिसरातील रस किंवा लोणच्यासाठी उत्कृष्ट, सुवासिक व वैशिष्ट्यपूर्ण गावरान आंब्यांची फळे या प्रदर्शनात आणून आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, तसेच जिल्ह्यातील तमाम आंबा प्रेमी व खवय्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून थेट शेतातून आलेल्या दर्जेदार आंब्यांचा व ज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button