गडचिरोलीविदर्भ

बसस्थानकावर दोन महिलांच्या बॅगमधून ८.६४ लाखांचे दागिने लंपास

बसच्या प्रतीक्षेत असताना घडली घटना ; आरमोरी पोलिसांनी आरोपी महिलेचे रेखाचित्र (स्केच) केले जारी

आरमोरी : येथील नवीन बसस्थानक परिसरात बसची प्रतीक्षा करीत असलेल्या दोन महिला प्रवाशांच्या बॅगांमधून चोरट्यांनी हात साफ करत तब्बल ८ लाख ६४ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १२:३० वाजताच्या दरम्यान घडली होती. याप्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेच्या आठ दिवसांनंतर पोलिसांनी रविवारी संशयित महिला आरोपीचे रेखाचित्र (स्केच) जारी केले आहे.

निधी रुपेश शेंडे (रा. नागपूर) आणि लता वामन जुवारे (रा. आरमोरी) या दोन्ही महिला आरमोरी येथील नवीन बसस्थानकात बसची वाट पाहत होत्या. बसस्थानकावरील गर्दीचा गैरफायदा घेऊन आरोपीने त्यांच्या बॅगमधील पर्स उघडून दागिने लंपास केले, अशी फिर्याद निधी शेंडे यांनी पोलिसांत दिली. निधी शेंडे यांच्या पर्समधून सोन्याचे ३५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, ३ ग्रॅम अंगठी, ५ ग्रॅमचे कॉईन,तसेच १ ग्रॅम सोन्याची नथ असे एकूण २ लाख ७६ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरीस गेले,तर लता वामन जुवारे यांच्या बॅगेतून सोन्याची ३० ग्रॅम चपलाकंठी, ३० ग्रॅम काळी पोत, १७ ग्रॅम मोहनमाळ आणि ७ ग्रॅम वजनाच्या तीन अंगठ्या असे एकूण ५ लाख ८८ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. चोरट्याने दोन्ही महिलांकडून एकूण ८ लाख ६४ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले आहेत.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, संशयित महिला सुमारे पाच फूट उंच, सावळ्या रंगाची होती. तिने जीन्स पॅन्ट व टॉप परिधान केलेला होता, तसेच तिच्या चेहऱ्यावर मुरूम होते. आरमोरी पोलिसांनी या वर्णनानुसार संशयित आरोपी महिलेचे स्केच जारी केले असून, नागरिकांनी या चोरीच्या तपासात पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button