गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

अतिदुर्गम भागातील शाळाबाह्य बालक शिक्षणाच्या प्रवाहात ; बालरक्षक बेडके यांचे सातत्यपूर्ण आणि प्रेरणादायी कार्य

एटापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात शिक्षणाची ज्योत पोहोचवण्याचे मोठे आव्हान असताना, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, जाजावंडी येथील बालरक्षक एम. सी. बेडके यांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि समर्पणाची भावना प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जाजावंडी परिसरातील अनेक शाळाबाह्य बालकांना शिक्षणाचा हक्क मिळाला आहे.

अलीकडेच बेडके यांना जंगलातील दुर्गम भागात वास्तव्य करणाऱ्या नानेश रमेश तुमरेटी या शाळाबाह्य बालकाची माहिती मिळाली. प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीची पर्वा न करता, बेडके यांनी जंगलातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी दिल्या. अनेक दिवसांच्या अथक पाठपुराव्यानंतर अखेर या बालकाला शोधून काढण्यात त्यांना यश आले. केवळ बालकाला शोधून न थांबता, त्यांनी पालकांशी आस्थेने संवाद साधून त्यांचा विश्वास संपादन केला आणि बालकाला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, जाजावंडी येथे विधिवत प्रवेश दिला. या महत्त्वपूर्ण कार्यात लाटारे, मनीष आणि मेश्राम यांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.

बेडके यांचे हे कार्य एकाच घटनेपुरते मर्यादित नाही. यापूर्वीही त्यांनी अनेक शाळाबाह्य बालकांना शोधून शाळेत दाखल केले आहे. जंगलातील डोंगरदऱ्यांत, कोरड्या नाल्यांच्या काठावर आणि विखुरलेल्या झोपड्यांमध्ये राहणारी मुले शाळेपासून वंचित राहू नयेत यासाठी त्यांनी सातत्याने जनजागृती, घरभेटी आणि पालकांचे समुपदेशन यांसारखे उपक्रम प्रभावीपणे राबविले आहेत.

त्यांच्या या समर्पित कार्यामुळे जाजावंडी परिसरातील शाळाबाह्य बालकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. कठीण भौगोलिक व सामाजिक परिस्थितीतही शिक्षणाचा दिवा अखंडपणे पेटता ठेवणाऱ्या बेडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्थानिक गावकऱ्यांकडून आणि शिक्षण विभागाकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button