
अपहरणाची बनावट तक्रार देणारी आई रिया फायेला २४ तासांत अटक; वैनगंगा नदीत फेकून दिल्याचा खुलासा
गोंदिया : गोंदिया तालुक्यातील डांगोर्ली येथील २० दिवसांच्या विराज नावाच्या बालकाचा खून जन्मदात्या मातेनेच केल्याचा अत्यंत धक्कादायक उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने केवळ २४ तासांत केला आहे. पोलिसांनी अपहरणाची खोटी तक्रार देणारी आई रिया राजेंद्रसिंह फाये (वय २२) हिला अटक केली असून, या समाजमनाला चटका लावणाऱ्या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
१८ नोव्हेंबर रोजी रिया फाये हिने रावणवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत मुलगा विराजचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची खोटी फिर्याद दाखल केली होती. १७ नोव्हेंबरच्या रात्री १०:१५ वाजता अज्ञात व्यक्तीने घरात घुसून बाळाला पळवून नेल्याचे तिने तक्रारीत म्हटले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या आदेशानुसार तपासाला युद्धपातळीवर सुरुवात झाली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि पुरुषोत्तम अहेरकर यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, साक्षीदार चौकशी आणि घटनास्थळाच्या निरीक्षणातून तपासाची दिशा निश्चित केली. फिर्यादीचे वक्तव्य वारंवार बदलणे, घटनास्थळी जबरदस्तीचा कोणताही पुरावा न मिळणे आणि घरातील संशयास्पद परिस्थिती यामुळे बाळाच्या आईवरच पोलिसांचा संशय बळावला. रियाला ताब्यात घेऊन कठोर चौकशी करताच तिने गुन्ह्याची कबुली दिली.
चौकशीदरम्यान रियाने दिलेली कबुली ऐकून पोलीस पथकही हादरले. “मला नोकरी करायची होती, बाळ आड येत होतं. पतीने गर्भपात करू दिला नाही. बाळामुळे घरात अडकून पडेन म्हणून त्याला संपवायचं ठरवलं,” असे तिने सांगितले. १७ नोव्हेंबरच्या रात्री १०:३० वाजता घरचे सर्व झोपले असताना तिने मुलगा विराजला उचलले, मागच्या दाराने बाहेर जाऊन थेट वैनगंगा नदीच्या पुलावरून पाण्यात फेकून दिल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
कबुलीनंतर पोलिसांनी तत्काळ नदीकाठी शोधमोहीम सुरू केली आणि काही तासांच्या प्रयत्नांनंतर वैनगंगा नदीतील पुलाखाली विराजचा मृतदेह आढळला. या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच रावणवाडी पोलिसांनी रियाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) अन्वये गुन्हा नोंदवून तिला अटक केली आहे.



