
दुधवाही नाल्याजवळील घटना, ओळख पटवण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू ; आत्महत्या की घातपात?
आरमोरी : आरमोरी तालुक्यांतर्गत पालोरा-अंतरजी मुख्य रस्त्यावरील दुधवाही नाल्याजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी (दि. २०) सकाळी ही घटना नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ आरमोरी पोलीस ठाण्याला माहिती दिली.
माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचा पंचनामा केला. मृत व्यक्ती अंदाजे ३० ते ४० वयोगटातील असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झाले आहे. मात्र, सदर व्यक्ती कोणत्या गावचा आहे किंवा तिची ओळख काय आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही.
पोलीस प्रशासनाने मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी परिसरातील गावांमध्ये तपास सुरू केला आहे. तसेच, नजीकच्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या ‘व्यक्ती हरवल्याच्या’ तक्रारी आणि मोबाईल लोकेशनवरूनही तपासणी केली जात आहे.
सदर व्यक्तीने आत्महत्या केली आहे, की हा काही घातपाताचा प्रकार आहे, हे पोलीस प्रशासनाच्या सखोल चौकशीअंती कळणार आहे. घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस प्रशासन करत आहे.



