
गडचिरोली : गडचिरोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या प्रचाराला वेग आला असून, प्रभाग क्र. १२ मध्ये भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी २१ नोव्हेंबर रोजी गृहभेट मोहीम सुरू केली. आपल्या स्नेहपूर्ण आणि वेगवान जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी प्रभागातील मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न केला.
ॲड. प्रणोती निंबोरकर (भांडेकर) यांनी घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या भेटीदरम्यान अॅड. निंबोरकर यांनी स्थानिक रहिवाशांशी थेट संवाद साधून प्रभागातील पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची स्थिती, पाणीपुरवठा, दैनंदिन अडचणी इत्यादी मूलभूत समस्यांची माहिती घेतली.
नागरिकांनी यावेळी स्वच्छ व सुबक शहर, मूलभूत सेवांची गुणवत्ता आणि विकासाचे सातत्य याबाबत आपल्या अपेक्षा स्पष्टपणे व्यक्त केल्या. अनेक रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध योजनांबाबत महत्त्वाच्या सूचनाही मांडल्या. या संवाद मोहिमेत नगरसेवक पदासाठी इच्छुक असणारे साक्षी आकाश बोलूवार आणि निखिल कारूजी चरडे हे देखील उपस्थित होते. त्यांनी नागरिकांकडून मिळालेल्या सूचना व अडचणींची नोंद घेत प्रभागाच्या पुढील नियोजनाबाबत ॲड. निंबोरकर यांच्याशी चर्चा केली.
या गृहभेटीमुळे प्रभागातील नागरिकांच्या प्रत्यक्ष गरजा आणि विकासासंबंधी महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट झाले असून, स्थानिकांनी या थेट जनसंपर्क उपक्रमाचे कौतुक केले आहे.



