
१३ वने ७% वन महसूल योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन
एटापल्ली : दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवा सुलभ व्हावी यासाठी एटापल्ली तालुक्यातील गट्टा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र (PHC) रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागणार आहे. ‘१३ वने ७ टक्के वन महसूल योजने’अंतर्गत गट्टा रोड येथील सिमेंट रस्ता बांधकाम कामाचे भूमिपूजन १९ नोव्हेंबर रोजी उत्साहात संपन्न झाले.
या विकासकामाच्या भूमिपूजन समारंभास स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि विविध सामाजिक संघटनांनी मोठी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदिवासी विविध सहकारी महामंडळ, नाशिक संचालक सैनु गोटा यांच्या हस्ते नारळ फोडून व भूमिपूजन करून बांधकामाला औपचारिक सुरुवात करण्यात आली. ग्रामस्थांनी या विकासकामाचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले.
यावेळी बोलताना सैनु गोटा म्हणाले की, “गट्टा परिसरातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी रस्त्याचे सुगम दळणवळण अत्यंत महत्त्वाचे आहे. वन महसूल योजनेद्वारे आम्ही दुर्गम भागांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य देत आहोत.” सिमेंट रस्ता पूर्ण झाल्यानंतर रुग्णवाहिका, आरोग्य कर्मचारी, गर्भवती महिला आणि रुग्णांना उपकेंद्रापर्यंत पोहोचणे अत्यंत सोपे होणार आहे. सध्या पावसाळ्यात चिखल व वाहतूक अडथळ्यांमुळे होणारी गैरसोय यामुळे दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी एम. एस. मेश्राम (ग्रामसेवक), गोविंद शहा (प्रतिष्ठित नागरिक), महिला मंडळातील कार्यकर्त्या, तसेच परिसरातील इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी या कामाचे महत्त्व अधोरेखित केले आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्याचे आश्वासन दिले. या उपक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने करण्यात आले होते. सर्व उपस्थितांनी या महत्त्वपूर्ण विकासकामाबद्दल समाधान व्यक्त करून प्रशासन व सैनु गोटा यांचे आभार मानले.



