
प्रशिक्षण व ४० हजार रुपयांच्या आर्थिक मदतीने सुरू केले सेतूकेंद्र; वार्षिक १.४४ लाख उत्पन्न मिळवत कुटुंबाला आधार
भंडारा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग कल्याण विभागाने ‘युथ फॉर जॉब’ (Youth4Jobs Foundation) या संस्थेशी करार करत दिव्यांगांच्या उत्थानासाठी आणि आर्थिक स्वावलंबनासाठी एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम हाती घेतला आहे. याच उपक्रमामुळे तुमसर, जि. भंडारा येथील पदवीधर युवक जुनेद रजा (४६% अस्थि-व्यंग) यांनी स्वावलंबन साधत एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
शारीरिक अडचणी आणि मर्यादित आर्थिक परिस्थितीमुळे जुनेद यांना सुरुवातीला स्थिर उपजीविका साधण्यात अडचणी येत होत्या. मात्र, Youth4Jobs Foundation – भंडारा या संस्थेमुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडले. संस्थेने जुनेद यांच्या क्षमतांची ओळख करून त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षणात सहभागी होण्याची संधी दिली. या प्रशिक्षणामध्ये तांत्रिक कौशल्ये, प्रभावी संवादकौशल्य, ग्राहक व्यवस्थापन, आणि उद्योजकतेसाठी आवश्यक घटकांचा समावेश होता. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ‘रंग दे’ (Rang De) यांच्या माध्यमातून त्यांना ₹४०,००० चे आर्थिक सहाय्य प्राप्त झाले. या पाठबळामुळे त्यांनी स्वतःचे सेतूकेंद्र (सायबर कॅफे) सुरू केले.
जुनेद रजा यांनी व्यवसायात मेहनत घेऊन ग्राहकांना विश्वसनीय सेवा देण्यावर भर दिला आणि अल्पावधीतच व्यवसायाला स्थिरता प्राप्त झाली. सध्या ते वार्षिक ₹१,४४,००० उत्पन्न मिळवत असून स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल घडवत आहेत. योग्य कौशल्यविकास, संस्थात्मक मार्गदर्शन आणि आवश्यक आर्थिक सहाय्य मिळाल्यास अपंगत्वावर मात करता येते, हे जुनेद यांनी सिद्ध केले.
जुनेद यांनी भविष्यात व्यवसाय विस्ताराचा निर्धार व्यक्त केला असून, त्यांची ही प्रगती इतर युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ‘युथ फॉर जॉब’ ही संस्था गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दिव्यांगांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करत असून, तळागाळातील तरुणांपर्यंत पोहोचून शाश्वत आणि सकारात्मक बदल घडवणे हेच त्यांचे ध्येय आहे.



