
मुक्तिपथ तालुका क्लिनिकतून उपचार सुरु
गडचिरोली : एकदा दारूचे व्यसन लागलेल्या रुग्णाला हळूहळू दुष्परिणाम जाणवू लागतात. क्षणभर आनंद घेण्यासाठी घेतलेला एक पेग कधी जीवघेणा ठरला, हे लक्षातच येत नाही. या व्यसनाच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी उपचार घेणे अत्यंत गरजेचे असते. यासाठी मुक्तिपथ अभियानाने बाराही तालुक्यात व्यसन उपचार क्लिनिकची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मागील आठवड्यात एकूण ७६ जणांनी लाभ घेतला आहे.
नैराश्य, चिंता किंवा इतर मानसिक आजार असलेल्या लोकांना ताण कमी करण्यासाठी किंवा आराम मिळवण्यासाठी दारू पिण्याची सवय लागू शकते. ‘मजा’ करण्यासाठी किंवा सामाजिक दबावामुळे काही लोक दारू पिण्यास सुरुवात करतात. या व्यसनामुळे आर्थिक, सामाजिक व आरोग्याचे नुकसान मद्यपीसह त्याच्या कुटुंबियांना सहन करावे लागते. घरात भांडण तंटे निर्माण होऊन महिलांना त्रास सहन करावा लागतो. दारूमुळे सुखी संसार उध्वस्त होण्याची शक्यता असते. जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला दारूचे व्यसन असेल, तर मुलांना सुद्धा व्यसन लागण्याची शक्यता वाढते. त्यामुळे दारूचे व्यसन संपूर्ण कुटुंबाचे नुकसान करण्यास कारणीभूत ठरतो. हा एक मानसिक आजार असून यातून बाहेर पडण्यासाठी मुक्तिपथने उपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील बाराही तालुका मुख्यालयात नियोजित दिवशी व्यसन उपचार क्लिनिक घेतल्या जातो. या माध्यमातून रुग्णांना योग्य तो सल्ला, समुपदेशन व औषोधोपचार देखील दिले जातात. यातून दारूचे व्यसन सोडण्यासाठी रुग्णांना मदत मिळतो. आतापर्यंत अनेकांनी या उपचार पद्धतीचा अवलंब करून दारूचे व्यसन सोडले आहे.
मागील आठवण्यात एकूण ७६ रुग्णांनी क्लिनिकला भेट देऊन दारू सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यात आरमोरी १२, एटापल्ली ८, देसाईगंज १२, मुलचेरा १८,चामोर्शी ९,कुरखेडा ६ व अहेरी येथील ११ रुग्णांचा समावेश आहे.



