
अर्चना बोरकुटे यांचे आ. डॉ. मिलिंद नरोटे यांना निवेदन
गडचिरोली : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, साखरा येथे उच्च श्रेणी मुख्याध्यापक पद मागील बऱ्याच काळापासून रिक्त असल्याने शाळेच्या शैक्षणिक कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम होत आहे. या रिक्त पदाच्या तातडीच्या भरतीसाठी ग्राम साखरा येथील उपसरपंच तथा भारतीय जनता पार्टी (महिला मोर्चा) जिल्हा महामंत्री अर्चना बोरकुटे यांनी सोमवारी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना निवेदन सादर केले.
निवेदनात बोरकुटे यांनी स्पष्ट केले की, सक्षम नेतृत्वाशिवाय शाळेतील शैक्षणिक उपक्रम, प्रशासनिक नियोजन आणि दैनंदिन गरजा प्रभावीरीत्या पूर्ण होऊ शकत नाहीत. मुख्याध्यापक पद रिक्त असल्याने अनेक प्रशासकीय निर्णय प्रलंबित राहतात, विविध शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी अडखळते आणि शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील समन्वयावर परिणाम होत आहे. शाळेतील विद्यार्थीसंख्या लक्षात घेता, एक अनुभवी आणि कार्यक्षम उच्च श्रेणी मुख्याध्यापक असणे अत्यंत आवश्यक आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तात्मक शिक्षणावर होत असून पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
बोरकुटे यांनी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना विनंती केली की, त्यांनी शिक्षण विभागाशी समन्वय साधून रिक्त पद भरण्याची प्रक्रिया गतीमान करावी. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेतली असून, शैक्षणिक हिताच्या कोणत्याही प्रश्नावर दुर्लक्ष केले जाणार नाही, असे आश्वासन दिले. संबंधित शासकीय यंत्रणेशी चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
या निवेदनामुळे ग्रामस्थ आणि पालकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, उच्च श्रेणी मुख्याध्यापकाच्या नियुक्तीने शाळेतील शैक्षणिक दर्जा उंचावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



