
दुर्गापुरमधील घटना ; सुरक्षा उपाययोजना नसल्याने नागरिकांमध्ये संताप
चंद्रपूर: शहराला लागून असलेल्या दुर्गापूर वॉर्ड क्रमांक ४, भीमनगर परिसरात रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पतंग उडवत असलेल्या एका १० वर्षीय बालकाचा ११ केव्हीच्या हायटेन्शन विद्युत तारेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. आभास अरविंद पटेल (वय १०) असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, वीज वितरण विभागाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
आभास भीमनगर येथील मुन्ना लोणारे यांच्या घराच्या स्लॅबवर पतंग उडवीत होता. घराच्या अगदी जवळून जाणाऱ्या उच्चदाबाच्या तारेचा पतंगाशी संपर्क येताच आभासला जोरदार विद्युत धक्का बसला आणि शेजाऱ्यांनी धाव घेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मृत आभास हा खेमाजी नाईक माध्यमिक आश्रमशाळा कारवा येथील वसतिगृहात राहत होता आणि दिवाळीच्या सुटीनंतर तो शाळेत परत गेला नव्हता.
ग्रामपंचायत सदस्य सुनील बरीयेकर यांनी या धोकादायक हायटेन्शन लाईनबाबत वीज वितरण विभागाकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र, कोणतीही सुरक्षा उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, ६ ते ७ वर्षांपूर्वी याच उच्चदाबाच्या तारेमुळे साखरे नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतरही संबंधित विभागाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही.
निष्काळजीपणामुळे पुन्हा एक निष्पाप जीव गमवावा लागल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नागरिकांनी आता या जीवघेण्या हायटेन्शन लाईनचे तातडीने स्थलांतर करून परिसर सुरक्षित करण्याची मागणी केली आहे.



