गडचिरोलीविदर्भ

अवैध दारूविक्री विरोधात लढा यशस्वी ; अतिदुर्गम ‘तमंदला’ गाव सलग ६ वर्षांपासून दारूमुक्त

गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण टोकावर वसलेल्या सिरोंचा तालुक्यातील तमंदला येथील गाव संघटनेने अवैध दारूविक्री विरोधात एकत्र येत लढा दिला असून, गावाला पूर्णपणे दारूमुक्त केले आहे. सन २०२० पासून या गावातील अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद असून, तमंदला हे एक आदर्श गाव म्हणून नावारूपास आले आहे. या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि भावी पिढीला प्रेरणा देण्यासाठी ग्रामस्थांनी गावात ‘विजयोत्सव’ साजरा करत विजयस्तंभ देखील उभारला आहे.

काही वर्षांपूर्वी तमंदला गावात मोठ्या प्रमाणावर घरगुती दारू गाळण्यासोबतच अवैध दारूची विक्री केली जात होती. इतकेच नव्हे तर शेजारच्या आदिमुत्तापूर व मुत्तापूर येथील दारू विक्रेतेही या गावात येऊन दारू विकायचे. यामुळे गावातील कौटुंबिक शांतता आणि आरोग्य धोक्यात आले होते. अशा परिस्थितीत मुक्तिपथ अभियानाने गावात पुढाकार घेऊन ग्रामस्थांची बैठक घेतली. या बैठकीतून गावातील महिलांची एक खंबीर ‘गाव संघटना’ स्थापन करण्यात आली आणि त्यांना वेळोवेळी कायदेशीर व सामाजिक मार्गदर्शन करण्यात आले.

महिलांनी एकत्र येत सर्वप्रथम गावातील आणि बाहेरून येणाऱ्या दारूविक्रेत्यांना कायदेशीर नोटीस बजावल्या. महिलांच्या या आक्रमक पवित्र्याला संपूर्ण गावाने साथ दिली आणि ग्रामसभेने गावात अवैध दारूविक्री बंद करण्याचा कायदेशीर ठराव पारित केला. केवळ ठराव घेऊन न थांबता, गाव संघटनेच्या महिलांनी दारूविक्री पूर्णपणे बंद होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला.

या मोहिमेदरम्यान केवळ दारूची विक्रीच बंद करण्यात आली नाही, तर गावातील ज्या रुग्णांची दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा होती, त्यांच्यासाठी मुक्तिपथ तर्फे गावातच व्यसन उपचाराची विशेष सोय करून देण्यात आली. विविध जनजागृतीपर उपक्रम राबवून ‘दारूमुक्तीशिवाय गावाचा विकास अशक्य आहे’ ही बाब ग्रामस्थांच्या मनावर बिंबवण्यात आली. लोकसहभागातून सुरू झालेल्या या लढ्याला आता तब्बल ६ वर्षे पूर्ण झाली असून, आजही गावात दारूविक्री पूर्णपणे बंद आहे. तमंदला गावाचा हा पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यासाठी पथदर्शी ठरत आहे. या यशामागे गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील  महिला, पुरुष, युवक-युवती तसेच मुक्तिपथच्या तालुका संघटिका सुनीता भगत, शंकर गागुरी व त्यांच्या संपूर्ण चमूचे मोलाचे योगदान लाभले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button