गडचिरोलीविदर्भ

महात्मा फुले स्मृतीदिनी गडचिरोलीत ‘शिक्षक दिन’ साजरा; विलास दरो समाजशिक्षक पुरस्काराने सन्मानित

‘सांस्कृतिक बदलाशिवाय मानवतावादाची प्रबलता अशक्य’ – निवृत्त सहआयुक्त किरण गावतूरे यांचे प्रतिपादन

गडचिरोली : भारतीय समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनी, २८ नोव्हेंबर रोजी जिल्हा माळी समाज संघटनेच्या वतीने फुले दाम्पत्य प्रतिष्ठान येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी हा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला निवृत्त सहआयुक्त किरण गावतूरे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लावली. “सांस्कृतिक बदलाशिवाय मानवतावादाची प्रबलता अशक्य” असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी वैचारिक आणि सांस्कृतिक स्तरावर बदल स्वीकारणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

उद्‌घाटिका, प्राचार्या मिरा शेंडे यांनी ज्योतिबांच्या विचारांचे तातडीने अंगिकार करण्याची गरज असल्याचे विषद केले. तर मार्गदर्शक प्रा. डॉ. सचिन शेंडे यांनी तात्यासाहेबांचे कार्य म्हणजे भारतीय स्वातंत्र्याची व भारतीय संविधानाची पायाभरणी होय, असे मत व्यक्त केले. या अभिवादन कार्यक्रमात विलास दरो (प्राथमिक शिक्षक) यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल समाजशिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संघटनेचे उपाध्यक्ष सुखदेवजी जेंगठे आणि स्वागताध्यक्ष जिल्हा माळी समाज संघटनेचे अध्यक्ष देवराव मोहुर्ले उपस्थित होते. यावेळी जिल्हाभरातील माळी समाज आणि परिसरातील बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महात्मा फुले यांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश वाढई यांनी केले, तर प्रास्ताविक राजेंद्र आदे आणि आभार नरेंद्र निकोडे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button