गडचिरोलीविदर्भ

साखरा शाळेसमोर मुलांची सुरक्षा धोक्यात! ; ‘स्पीड ब्रेकर’ नसल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी

सामाजिक कार्यकर्ते दिनेश बोरकुटे यांनी निवेदनाद्वारे वेधले प्रशासनाचे लक्ष ; दुहेरी निकषाचा आरोप

गडचिरोली : गडचिरोली-नागपूर राज्य महामार्ग क्रमांक ३५३ सी वरील साखरा गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची सुरक्षा गंभीर धोक्यात असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते दिनेश बोरकुटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जन-निवेदन पोर्टलवर निवेदन दाखल करून प्रशासनाच्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले आहे.

गडचिरोली शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेली साखरा येथील प्राथमिक शाळा थेट राज्य महामार्गालगत, केवळ २० फुटांच्या अंतरावर आहे. वेगाने धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे शेकडो विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागतो. १५ सप्टेंबर रोजी निवेदन सादर करूनही राष्ट्रीय महामार्ग विभागाने केवळ रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या मारून औपचारिकता पूर्ण केली. हा उपाय मुलांच्या सुरक्षेसाठी अजिबात पुरेसा नाही, उलट धोका जसाच्या तसा कायम असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

निवेदनात प्रशासनावर दुहेरी निकष लागू केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. “याच मार्गावरील प्लॅटिनम ज्युबिली इंग्लिश स्कूल समोर राष्ट्रीय महामार्ग विभागाने मजबूत आणि कायमस्वरूपी स्पीड ब्रेकर बसवले आहेत. शहरातील प्रतिष्ठित शाळांसाठी तातडीने उपाययोजना होतात, पण ग्रामीण शाळांसाठी केवळ औपचारिकता पार पाडली जाते. यामुळे स्थानिक नागरिक व पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.”

मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत खालील कायमस्वरूपी उपाययोजना तात्काळ करण्याची मागणी करण्यात आली आहे. मजबूत व स्थायी गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बांधणे. मोठे व स्पष्ट चेतावणी फलक लावणे. ‘स्कूल झोन’ आणि वेगमर्यादा दर्शवणारे संकेतक बसवण्याची मागणी करण्यात आली आहे.

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित प्राधिकरणांनी संभाव्य मोठी दुर्घटना टाळण्यासाठी साखरा येथील पालकांची चिंता दूर करावी आणि तात्काळ निर्णायक पाऊल उचलावे, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button