गोंदियाविदर्भ

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांच्या शौर्यगाथेची भव्य चित्ररथ यात्रा ; विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गोंदिया : धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी आपले सर्वोच्च बलिदान देणारे शीख धर्माचे नववे गुरु, ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर सिंग यांच्या ३५० व्या शहीद समागम वर्षाच्या निमित्ताने गोंदिया जिल्ह्यात सध्या शौर्य आणि त्यागाची महती सांगणारा भव्य चित्ररथ फिरत आहे. गुरुजींचा शौर्यशाली इतिहास नागरिकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना सहज कळावा, यासाठी सुरू असलेल्या या चित्ररथ यात्रेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

श्री गुरु तेग बहादूर सिंग यांचा बलिदान दिवस हा संपूर्ण देशात ‘शहीद दिवस’ म्हणून पाळला जातो. त्यांची शहादत व योगदान हे धर्म आणि मानवतेच्या रक्षणाचे तेजस्वी प्रतीक आहे. या महान बलिदानाचे महत्त्व सर्वदूर पोहोचावे यासाठी हा चित्ररथ फिरत आहे. या उपक्रमाद्वारे श्री गुरु तेग बहादूर यांचा शौर्यशाली इतिहास नागरिकांना व विद्यार्थ्यांना माहिती व्हावा. शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल आणि सिंधी यांसारख्या विविध समाजांसाठी गुरुजींचे असलेले महत्त्व जगासमोर आणणे. या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे:

सध्या जिल्ह्यात फिरणाऱ्या या आकर्षक चित्ररथामध्ये श्री गुरु तेग बहादूर सिंग यांची संपूर्ण शौर्यगाथा गाण्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे दर्शविण्यात येत आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये विशेषतः हा चित्ररथ फिरवून विद्यार्थ्यांपर्यंत गुरुजींचे देशप्रेम, बलिदान आणि शौर्यगाथा पोहोचवली जात आहे. जिल्ह्यातील नागरिक मोठ्या उत्साहाने चित्ररथाचे दर्शन घेऊन माहिती जाणून घेत आहेत, ज्यामुळे समागमाच्या उद्देशाला उत्तम प्रसिद्धी मिळत आहे.

या ३५० व्या शहीद समागमचा प्रथम टप्प्यातील महत्त्वाचा कार्यक्रम नजीकच्या नागपूर येथे रविवारी, ०७ डिसेंबर रोजी होत आहे. चित्ररथावर या नागपूर येथील मुख्य कार्यक्रमाच्या माहितीचे फलकही लावण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button