
० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला ‘दोन थेंब’ पाजण्याचे जिल्हाधिकारी व पदाधिकाऱ्यांचे आवाहन; लोकचळवळ उभारणार
गोंदिया : भारताने जरी पोलिओमुक्त देशाचा बहुमान मिळवला असला, तरी जागतिक स्तरावरील धोका लक्षात घेता हा आजार पुन्हा पाय पसरू नये यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा आरोग्य समितीची अत्यंत महत्त्वपूर्ण आढावा बैठक २५ जून रोजी जिल्हा परिषद सभागृहात पार पडली. जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, उद्या २८ जून रोजी राबवल्या जाणाऱ्या मोहिमेच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुरेशजी हर्षे यांनी मोहिमेच्या प्रभावी नियोजनाबाबत आरोग्य विभागाला आवश्यक ते निर्देश दिले.
बैठकीत मार्गदर्शन करताना जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर म्हणाले की, “जगातील काही देशांमध्ये अद्यापही पोलिओचे विषाणू सक्रिय असल्याने आपल्या देशासमोरील धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक पालकाने आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला २८ जून रोजी पोलिओचे ‘दोन थेंब’ अवश्य पाजावेत. पोलिओमुक्त भारताचे स्थान कायम राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने ही आपली राष्ट्रीय जबाबदारी समजून मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा.”
उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुरेशजी हर्षे यांनी आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेत सांगितले की, जिल्ह्यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गाव, पाडा तसेच दुर्गम व अतिदुर्गम भागातील बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष पोलिओ बूथ, मोबाईल पथके आणि बसस्थानके-रेल्वे स्थानकांवर ट्रान्झिट पथकांची प्रभावी व्यवस्था करण्यात आली आहे. या मोहिमेला लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायती, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन ‘लोकचळवळीचे’ स्वरूप द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी जनतेला भावनिक आवाहन केले की, “२८ जून रोजी आपल्या स्वतःच्या घरातीलच नव्हे, तर शेजारील आणि नातेवाईकांच्या घरातील ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व चिमुरड्यांना जवळच्या पोलिओ बूथवर घेऊन जावे. आपल्या मुलांचे निरोगी भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांनी जागरूक राहावे.”
या बैठकीस जिल्हा परिषदेच्या सदस्या रचना गहाणे, छाया नागपुरे, गीता लिल्हारे, वैशाली पंधरे, सुधा रहांगडाले, प्रवीण पटले, डॉ. भूमेश्वर पटले, रूपेश कुथे तसेच आरोग्य विभागाच्या वतीने सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे, साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, मिलिंद नंदागवळी, प्रशांत खरात यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी (THO) उपस्थित होते. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून मोहीम १००% यशस्वी करावी, असे निर्देश शेवटी देण्यात आले.



