गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

अबुझमाड जंगल परिसरात पोलीस-नक्षल चकमक ; तीन नक्षलवादी ठार, जवान शहीद

एक जवान जखमी ; घटनास्थळावरून एके-४७ आणि एक एसएलआर रायफल जप्त

गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील अबुझमाडच्या घनदाट जंगलात गेल्या तीन दिवसांपासून पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. मात्र, या चकमकीत गडचिरोली पोलीस दलाचे जवान दीपक चिन्ना मडावी यांना वीरमरण आले असून, अन्य एक जवान जखमी झाला आहे.

जिल्ह्यातील भामरागड तालुक्याला लागून असलेल्या अबुझमाड भागात नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, पोलीस दलाने विशेष शोधमोहीम हाती घेतली होती. गेल्या ७२ तासांपासून या दुर्गम भागात चकमक सुरू होती. चकमकीत एकूण ३ नक्षलवादी ठार झाले आहेत, ज्यामध्ये २ पुरुष आणि १ महिला नक्षलवाद्याचा समावेश आहे. अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. घटनास्थळावरून पोलिसांनी एक एके-४७ आणि एक एसएलआर (SLR) रायफल जप्त केली आहे.

या चकमकीत दीपक चिन्ना मडावी (वय ३८ वर्षे) हे जवान गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने भामरागड येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते मूळचे मांड्रा (ता. अहेरी) येथील रहिवासी होते. अन्य एक जवान जोडा मडावी (रा. किष्टयापल्ली) हेदेखील गोळी लागल्याने जखमी झाले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

हा भाग अत्यंत दुर्गम आणि घनदाट जंगलाचा असल्याने जवानांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खराब हवामान आणि भौगोलिक आव्हाने असूनही, परिसरात अद्याप काही नक्षलवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने सर्च ऑपरेशन अधिक तीव्र करण्यात आले आहे. “जवानांनी अतिशय धैर्याने ही मोहीम राबवली आहे. दुर्गम भागामुळे अडथळे येत असले तरी शोधमोहीम पूर्ण झाल्यावरच अधिक तपशील स्पष्ट होईल.” असे पोलीस दलाकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button