
नागपूर विभागस्तरीय युवा महोत्सव ; महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार
गडचिरोली : क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपूर विभाग स्तरीय युवा महोत्सव २०२५-२६ स्पर्धा नुकतीच पार पडली. आदर्श पदवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत समूह लोकनृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाचा गौरव वाढवला.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयात त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शाम खंडारे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. विभाग प्रमुख प्रा. पंकज राऊत, डॉ. प्रीती भांडेकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अंतबोध बोरकर, प्रा. विजया उके, विद्यार्थी विकास विभागाचे ऋतिक कोहळे यांच्यासह सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. खंडारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शैक्षणिक प्रगतीसोबतच सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आपल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. विद्यार्थ्यांचे हे यश इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.



