नागपूरविदर्भ

दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवून ‘संविधान विरोधी’ कारभार; महाविकास आघाडीचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार

‘दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या करत असताना चहापानाला जाणे चुकीचे‘ ; विदर्भातील प्रश्नांवर न्याय मिळणार नाही – विरोधक आक्रमक

नागपूर : महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमधील विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवण्यात आले आहे. या ‘संविधान विरोधी’ भूमिकेचा निषेध करत महाविकास आघाडीने हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. राज्यात दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या करत असताना असंवेदनशील सरकारच्या चहापानावर जाणे योग्य नाही, अशी कडाडून टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक नागपूर विधानभवनात पार पडली. या बैठकीनंतर नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर निशाणा साधला. विजय वडेट्टीवार (काँग्रेस) म्हणाले, “विरोधी पक्षनेते हे संवैधानिक पद असताना त्यावर नेमणूक होत नाही, हे सरकार संविधान विरोधी आहे.” विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी ‘स्वातंत्र्यानंतर सर्वच प्रथा पाळणे अभिप्रेत नाही,’ असे विधान करून लोकशाहीला घातक भूमिका घेतली आहे. भास्कर जाधव (शिवसेना, उबाठा) यांनी “सत्ताधाऱ्यांना संविधान नको, मनुस्मृती हवी आहे, म्हणूनच सभापतींनी असे विधान केले.”

विदर्भात अधिवेशन होत असताना, केवळ सात दिवसांचा कालावधी ठेवल्याबद्दल विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असून, दिवसाला सरासरी ८ शेतकरी आत्महत्या करत आहेत. अनिल देशमुख (राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार गट) म्हणाले, विदर्भातील कापूस, सोयाबीन, धान उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. कापूस खरेदी होत नाही, परदेशातून कापूस आयात करून आयात कर शून्य केला आहे. सोयाबीनला हमीभाव नाही, तर धानाला बोनस दिलेला नाही. राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे ७५.४२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने अद्याप महाराष्ट्राला एक पैशाचीही मदत केली नाही. “सत्ताधारी तिन्ही पक्ष एकमेकांना निधी मिळावा म्हणून भांडण करतात, पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे,” अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

भास्कर जाधव म्हणाले, “महायुती सरकारकडे पाशवी बहुमत असताना विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. सगळे मंत्री कंत्राटदार बनून तिजोरी लुटत आहेत. तिन्ही पक्षांमध्ये भ्रष्टाचार सगळ्यात जास्त कोण करणार, याची स्पर्धा सुरू आहे. हे ‘स्थगिती सरकार’ आहे.” राज्यात १८ वर्षांखालील ‘लाडक्या लेकी’ असुरक्षित असून, सरासरी दररोज २४ अल्पवयीन मुलींची छेडछाड किंवा अत्याचार केला जात आहे. मुंबईत सर्वाधिक घटना घडल्या आहेत.

काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाने केलेल्या कथित महार वतनाची जमीन नियमबाह्य पद्धतीने खरेदी केल्याच्या प्रकरणावरून टीका केली. “जमीन विकली त्यांच्यावर कारवाई झाली, पण जमीन विकत घेणाऱ्यांवर कारवाई होत नाही, हा महायुती सरकारचा अजब न्याय आहे,” असे ते म्हणाले.

या बैठकीला काँग्रेस पक्षाकडून काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नितीन राऊत, आमदार अभिजित वंजारी आणि प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भास्कर जाधव, सुनील प्रभू आणि अनिल परब उपस्थित होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी मंत्री अनिल देशमुख उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button