गडचिरोलीविदर्भ

खड्डेमय व अपूर्ण रस्त्यासाठी अहेरीत भाजपचे ‘चक्काजाम’ आंदोलन

जीवघेणे खड्डे, अपघात आणि धुळीमुळे नागरिक त्रस्त ; अधिकाऱ्यांनी ३ दिवसांत काम सुरू करण्याचे दिले आश्वासन

अहेरी : अहेरी शहरातील मुख्य चौकातून जाणाऱ्या अंदाजे २ किलोमीटर लांबीच्या खड्डेमय व अपूर्ण रस्त्याच्या बांधकामाविरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुख्य चौकात दीड तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) कार्यकारी अभियंता रोहित रव्वा यांनी तीन दिवसांत रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल आणि १०० टक्के काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

अहेरी शहराच्या कै. राजे विश्वेश्वरराव महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. रस्त्याची झालेली दुरवस्था, जीवघेणे खड्डे, नागरिकांचे होणारे हाल, वाढते अपघात आणि धुळीमुळे व्यापारी वर्गाचे होत असलेले नुकसान, या गंभीर बाबींचा निषेध नोंदवत भाजपने प्रशासनाचे लक्ष वेधले. भाजपा पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाला धारेवर धरत, रस्त्याचे काम तात्काळ सुरू करून पूर्ण करावे आणि कामास कोणताही विलंब लावू नये, अशी आग्रही मागणी लावून धरली.

कार्यकारी अभियंता रोहित रव्वा यांनी आंदोलकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू करण्याची लेखी हमी दिली. या आश्वासनामुळे अहेरीतील नागरिकांना आता खड्डेमुक्त रस्त्याची अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button