मुलचेरा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना बडतर्फ करा – संतोष ताटिकोंडावार यांची मागणी

गडचिरोली : मुलचेरा येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री यांच्या कार्यपद्धतीवर आणि गैरवर्तनावर ‘जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समिती’चे जिल्हाध्यक्ष संतोष ताटिकोंडावार यांनी गंभीर आरोप करत त्यांना त्वरित बडतर्फ करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. डॉ. म्हशाखेत्री यांच्या त्रासाला कंटाळून एका आरोग्य सेविकेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
डॉ. विनोद म्हशाखेत्री यांनी मुलचेरा येथे कार्यरत असलेल्या एका आरोग्य सेविकेस वारंवार अश्लील संदेश (WhatsApp) पाठवून मानसिक त्रास दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. हे संदेश पुराव्याच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. डॉ. म्हशाखेत्री यांच्या त्रासाला कंटाळून सदर आरोग्य सेविकेने शेतीच्या वापरातील विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, तात्काळ उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला असून, तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. यापूर्वी डॉ. म्हशाखेत्री यांच्या दुर्लक्षामुळे मुलचेरा तालुक्यातील प्रा. आ. केंद्र लगामच्या कार्यकक्षेत डेंग्यूचा प्रार्दुभाव होऊन त्यात पाच निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता.
संतोष ताटिकोंडावार यांनी म्हटले आहे की, डॉ. म्हशाखेत्री यांच्याकडून केवळ एका आरोग्य सेविकेस नव्हे, तर अन्य आरोग्य कर्मचारी आणि महिला कर्मचाऱ्यांनाही त्रास देण्यात आला आहे. त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महिला समिती गठीत करावी. तालुका आरोग्य अधिकारी हे स्थानिक वैद्यकीय अधिकारी असल्याने ते वरिष्ठ अधिकारी वर्गाशी संगनमत करून चौकशीवर प्रभाव टाकण्याची शक्यता आहे, त्यामुळे महिला समितीद्वारे चौकशी होणे गरजेचे आहे.
डॉ. म्हशाखेत्री यांच्याकडून घडलेला हा प्रकार आरोग्य विभागाची प्रतिमा मलीन करणारा आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने बडतर्फीची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटिकोंडावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.



