गोंदियाविदर्भ

आरोग्य सुविधांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवा – तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नंदागवळी यांचे निर्देश

माता व बाल संगोपन, कुटुंब कल्याण, टीबी मुक्त भारत अभियानसह विविध राष्ट्रीय कार्यक्रमांचा आढावा

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील आरोग्य सेवा आणि विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी तालुकास्तरीय सभा तिरोडा येथील पंचायत समिती सभागृहात नुकतीच संपन्न झाली. या सभेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दर्शना नंदागवळी यांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना संस्थात्मक प्रसुती वाढवण्यासह आरोग्य योजना गावपातळीवरील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले.

आढावा सभेप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दर्शना नंदागवळी, डॉ. धनंजय मिश्रा, जिल्हा शीत साखळी व्यवस्थापक मीनाक्षी सयाम, आरोग्य विस्तार अधिकारी अजय वासनिक, भुरे, पाचही प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका तसेच उपकेंद्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा गट प्रवर्तक उपस्थित होते.

सभेत माता व बाल संगोपन, कुटुंब कल्याण, नियमित लसीकरण, कुपोषण आणि नवसंजीवनी योजना. हिवताप, क्षयरोग (प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियान), कुष्ठरोग, सिकलसेल आणि हत्तीपाय रोग. जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, बाल सुरक्षा कार्यक्रम आणि दोन कोटी महिलांची आरोग्य तपासणी अभियान. ई-व्हीडन्स अ‍ॅप, यू-विन पोर्टल, आरसीएच पोर्टल-२.०, आणि किलकारी यांसारख्या आरोग्य विषयक पोर्टलचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दर्शना नंदागवळी यांनी वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना स्पष्ट निर्देश दिले की, आरोग्य संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी संस्थात्मक प्रसुती वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच, सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आणि योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून त्या योजना गावपातळीवरील शेवटच्या घटकांपर्यंत जनमानसात पोहचवाव्या लागतील, असे त्यांनी बजावले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button