
महिला सशक्त झाली तर समाज परिवर्तन अटळ – माजी आमदार कृष्णा गजबे
देसाईगंज : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प देसाईगंजच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तालुका स्तरीय महिला मेळावा गुरुवार, 18 सप्टेंबर रोजी देसाईगंज येथील हटवार मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाबरोबरच बेटी बचाओ, बेटी पढाओ, महिलांचे आरोग्य व पोषण, महिलांशी संबंधित कायदे, कुपोषण व बालमृत्यू कमी करणे तसेच शासनाच्या महिला कल्याणकारी योजनांची माहिती देवाणघेवाण करण्यात आली.
उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार कृष्णा गजबे, आमदार रामदास मसराम, जि.प. गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू, गट विकास अधिकारी प्रणाली खोचरे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार कृष्णा गजबे यांनी मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगितले की, महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांचा उल्लेख करून सांगितले की, “महिला ही प्रत्येक घराचा आधारस्तंभ आहे. महिला सबलीकरण हे समाज प्रगतीचे खरे बळ आहे. महायुतीचे हे आपले सरकार असून महिलांच्या विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. त्यात ‘लाडकी बहीण’ सारखी महत्त्वाची योजना महिलांना आर्थिक व सामाजिक बळकटी देणारी ठरत आहे. शासनाच्या या सर्व योजना घराघरात पोहोचल्या पाहिजेत, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा.”
ते पुढे म्हणाले की, “आज महिला शिक्षण, स्वावलंबन आणि उद्योजकतेच्या माध्यमातून समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करत आहेत. बेटी बचाओ, बेटी पढाओ ही मोहिम केवळ घोषवाक्य राहता कामा नये, तर ती कुटुंबाचा संस्कार व्हायला हवी. आरोग्य व पोषण या बाबींमध्ये सजग राहून महिलांनी कुपोषण आणि बालमृत्यूवर मात करण्याची वेळ आली आहे.”
गजबे यांनी आवाहन केले की, “महिला जर ज्ञान संपन्न, आरोग्यदायी आणि स्वावलंबी झाली, तर ती केवळ कुटुंब नव्हे तर संपूर्ण समाज बदलू शकते. आपल्या भगिनींनी शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेऊन प्रगतीच्या वाटेवर पुढे जात राहावे, हाच आजच्या मेळाव्याचा हेतू आहे.”
अॅड. जुईली मेश्राम यांनी महिलांविषयक कायद्यांवर मार्गदर्शन केले. डॉ. अशोक महाणे यांनी आरोग्य व पोषणावर व्याख्यान दिले. शिक्षिका जैयमिना लाडे यांनी “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या विषयावर विचार मांडले. सामाजिक कार्यकर्ते अरविंद घुटके यांनी महिला सशक्तीकरणावर आपले मत व्यक्त केले. या मेळाव्यास कर्मचारीवृंद, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच तालुक्यातील महिला-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



