गडचिरोलीविदर्भ

आरमोरी परिसरात दोन महिलांचा बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद

वनविभागाने मध्यरात्री सापळा लावून पकडले ; नागरिक आणि ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास

आरमोरी : आरमोरी तालुक्यातील इंजेवारी-देऊळगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवून दोन महिलांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर वनविभागाने मध्यरात्री (दि. ११ डिसेंबर) सापळ्यात अडकवून जेरबंद केले आहे. वनविभागाचे ‘ऑपरेशन लेपर्ड’ यशस्वी ठरल्याने भीतीच्या सावटाखाली जगणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

इंजेवारी-देऊळगाव परिसरात बिबट्याचा मुक्त वावर सुरू असल्याने नागरिकांना शेतात जाणे किंवा रात्री घराबाहेर पडणेही कठीण झाले होते. सलग दोन प्राणघातक हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी मुख्य मार्गावर चक्काजाम आंदोलन छेडून बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या मागणीची दखल घेत वनविभागाने तातडीने शोधमोहीम हाती घेतली.

जलद प्रतिसाद पथक (RRT) गडचिरोली आणि स्थानिक वनकर्मचारी यांनी संयुक्त समन्वय साधत जंगल परिसरात विविध ठिकाणी सापळे उभारले आणि पाळत वाढवली. सततच्या निरीक्षणानंतर आणि अथक प्रयत्नांनंतर, अखेर ११ डिसेंबरच्या मध्यरात्री बिबट्या पिंजऱ्यात अडकला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाल टोंगे यांनी प्रथमोपचार व तपासणी केल्यानंतर बिबट्याला गोरेवाडा प्राणिसंग्रहालय व वन्यप्राणी बचाव व पुनर्वसन केंद्र, नागपूर येथे हलविण्यात आले.

या मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी के.आर. धोंडणे, रवींद्र चौधरी, जीवशास्त्रज्ञ ललित उरकुडे, जलद प्रतिसाद पथकाचे भाऊराव वाढई, अजय कुकडकर, मकसूद अली सय्यद, निखिल बारसागडे, कुणाल निमगडे, गुणवंत बावनवाडे आदींचे मोलाचे योगदान लाभले.

वनविभागाच्या संयमी आणि अचूक कारवाईमुळे गेल्या काही दिवसांपासूनचे दहशतीचे वातावरण दूर झाले असून नागरिकांनी वनविभागाच्या पथकाचे मनापासून कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button