
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील पन्नेमारा येथे गोंडवाना समाज सर्कल, मुरुमगाव यांच्या पुढाकाराने मुरुमगाव इलाख्यातील 19 गावांच्या प्रतिनिधींची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत समाजहितासाठी गावात दारू विक्री, घरगुती दारू काढणे यावर पूर्णपणे बंदी घालण्याचा ठराव पारित करण्यात आला.
गोंडवाना समाज सर्कल मुरुमगाव हे दर दोन महिन्यांनी एका गावाची निवड करून सामाजिक बैठक आयोजित करते. या बैठकांचा उद्देश समाज प्रबोधन करणे. जल, जंगल, जमीन आणि आदिवासी संस्कृतीचे जतन करणे. तरुण युवकांना शिक्षणाविषयी मार्गदर्शन करणे. दारूविक्री सुरू असलेल्या गावातून अवैध दारूविक्री हद्दपार करण्यासाठी नियोजन करून ही जबाबदारी गाव पाटील यांच्याकडे देणे. नुकतेच पन्नेमारा येथे गोंडवाना समाज सर्कल मुरुमगाव इलाख्याची बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित गावात सुरु असलेल्या अवैध दारूविक्रीच्या मुद्द्यावर चर्चा करून विचारविनिमय करण्यात आले. मुक्तिपथ तालुका प्रतिनिधी भाष्कर कड्यामी यांनी अवैध दारूमुळे आदिवासी समाजावर होणारे परिणाम, गावांचा खुंटलेला विकास, दारूच्या आहारी गेलेल्या युवकांची अधोगती, महिलांना होणारा त्रास आदी गंभीर बाबींवर मार्गदर्शन करून ग्रामसभेच्या अधिकारांचा वापर करून दारूमुक्त गाव निर्माण करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, पन्नेमारा येथे सुरू असलेली अवैध दारूविक्री आणि घरगुती दारू वापर कमी करून पुढे पूर्णपणे बंद करण्याचा ठराव घेण्यात आला. याशिवाय, बाहेर गावाहून आलेल्या सिंधी विक्रेत्यांना गावात ठेवायचे नाही, असाही महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. या ठरावामुळे गावातील सामाजिक स्वास्थ्य आणि युवकांचे भविष्य सुधारण्यास मोठी मदत मिळणार असल्याची आशा व्यक्त होत आहे.
बैठकीचे नेतृत्व तुळशीराम कोरेटी (इलाका अध्यक्ष) यांनी केले. त्यांच्यासोबत अमरसिंग मडावी, शिवनाथ टेकाम, श्रावण शहा मडावी, मुरारी हलामी, लता पुन्घाटे, शेवंता हलामी (सरपंच), हरिराम धुर्वे, एम पोटावी, बिंदिया मडकाम यांच्यासह 19 गावांमधील गाव पाटील, पुजारी, भूमिया, जमीदार, माजी ग्रामसभा अध्यक्ष, सचिव, सरपंच, आणि पोलिस पाटील, शेकडो महिला, पुरुष उपस्थित होते.



