गडचिरोलीविदर्भ

खतांच्या ‘लिंकिंग’मुळे शेतकऱ्यांचे शोषण, खात विक्रेत्या कंपन्यांवर कारवाई करावी – आ. रामदास मसराम यांची कृषीमंत्र्यांकडे मागणी

कंपन्यांच्या मनमानीमुळे खतांचा तुटवडा, अनावश्यक उत्पादने शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचा आरोप 

आरमोरी : खरीप हंगामाची सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना खतांचा वेळेवर पुरवठा होणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र सध्या कंपन्यांची मनमानी आणि शासनाच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात खतांचा पुरवठा झालेला नाही, असा आरोप अर्जुनी मोरगावचे आमदार रामदास मसराम यांनी केला आहे. खतांसोबत अनावश्यक ‘लिंकिंग’ करत शेतकऱ्यांच्या माथी इतर उत्पादने मारणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी आणि ही ‘लिंकिंग’ पद्धत तातडीने बंद करावी, अशी मागणी आ. मसराम यांनी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार मसराम यांनी निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात शेतकऱ्यांना धान पिकासह विविध पिकांसाठी खतांची मोठी गरज आहे. परंतु, खत कंपन्या खतासोबत ‘लिंकिंग’ स्वरूपात अनावश्यक दुय्यम खते, कीटकनाशके, औषधे विक्रेत्यांना घेण्यास जबरदस्ती करत आहेत. जर विक्रेत्यांनी यासाठी विरोध केला, तर त्यांना खताचा पुरवठा केला जात नाही. परिणामी, विक्रेत्यांना मजबुरीने ही उत्पादने घ्यावी लागतात आणि ती पुढे शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात.

सदर ‘लिंकिंग’ उत्पादनांची किंमत खतांच्या किमतीपेक्षाही जास्त असल्याने खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. एका खताच्या बॅगेमागे दोनशे रुपयांपेक्षा अधिक ‘लिंकिंग’चा खर्च शेतकऱ्यांच्या माथी मारला जात आहे. हे एक प्रकारे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषणच आहे, असे आ. रामदास मसराम यांनी स्पष्ट केले.

यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, उपाध्यक्ष दिलीप घोडाम, सरपंच शिल्पा कोल्हे, ग्रा.पं. सदस्य होमराज प्रधान, उपसरपंच धनपाल मिसार, अन्नाजी लिंगायत, डाकराम प्रधान, धनराज दोनाडकर, जगन माकडे, गणपत कोपुलवार, विठ्ठल प्रधान, विकी प्रधान, उपसरपंच मनोज पाजलवार, पोलिस पाटील दिपक हारगुडे, दिगांबर राऊत, ज्ञानेश्वर हारगुडे, सुनील प्रधान, प्रल्हाद राऊत, चरण दोनाडकर, जैराम नागरे, नामदेव बगमारे, मधुकर धोगरे, रविंद्र बगमारे, मोरेश्वर लाकडे, हरिहर ढवळे, नंदकिशोर मातेरे, पुरुषोत्तम बाडे, गिरीधर कराकर, सुरेश दुमाने यांसह अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button