
गडचिरोली कृषी विज्ञान केंद्राला भेट ; सेंद्रिय उत्पादनांद्वारे विश्वासार्हता निर्माण करण्याचे आवाहन
गडचिरोली : भविष्यात मानवी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल, तर अन्नासोबतच मातीचे आरोग्य टिकवणे ही काळाची गरज आहे. रासायनिक खतांचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी घातक ठरत असून, ‘सेंद्रिय व नैसर्गिक शेती’ हाच त्यावर एकमेव शाश्वत उपाय आहे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील कार्यकारी परिषदेचे सदस्य शिवराम घोडके यांनी केले.
राज्यपाल नियुक्त कार्यकारी परिषद सदस्य म्हणून घोडके यांनी नुकतीच कृषी विज्ञान केंद्र (KVK), सोनापूर-गडचिरोली येथे भेट देऊन विविध प्रक्षेत्रांची पाहणी केली आणि शास्त्रज्ञांना मोलाचे मार्गदर्शन केले. नैसर्गिक शेती प्रक्षेत्रावरील संशोधन प्रकल्पांची पाहणी करताना घोडके यांनी शास्त्रज्ञांशी सविस्तर चर्चा केली. त्यांनी रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरून पिकवलेल्या फळभाज्या व अन्नधान्य मानवी शरीरासाठी दीर्घकाळात अत्यंत घातक ठरतात. सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीचा प्रसार केवळ कागदावर न राहता तो थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.जर आपण विषमुक्त, शुद्ध सेंद्रिय फळभाज्या आणि कडधान्य अत्यंत विश्वासाने पिकवून ग्राहकांना दिले, तरच सेंद्रिय शेतीबद्दल समाजात मोठी विश्वासार्हता निर्माण होईल. या मुद्द्यांवर विशेष भर दिला.
याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्रातील विविध विषयांच्या तज्ञांनी घोडके यांना त्यांच्या विभागात सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. या भेटीदरम्यान डॉ. किशोर झाडे (वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख, KVK गडचिरोली), निलीमा पाटील (विषय विशेषज्ञ – गृह विज्ञान), डॉ. विक्रम एस. कदम (विषय विशेषज्ञ – पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र), पुष्पक ए. बोथीकर (विषय विशेषज्ञ – पीक संरक्षण), डॉ. प्रितम एन. चिरडे (विषय विशेषज्ञ – कृषिविद्या), सुचित के. लाकडे (विषय विशेषज्ञ – उद्यानविद्या), एन. पी. बुद्धेवार (विषय विशेषज्ञ – कृषी हवामान शास्त्र), प्रक्षेत्र व्यवस्थापक सुनीता थोटे, हवामान निरीक्षक मोहितकुमार गणवीर आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. या भेटीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील सेंद्रिय शेती मोहिमेला नवीन ऊर्जा मिळणार असल्याची भावना डॉ. किशोर झाडे यांनी व्यक्त केली.



