
खा. प्रफुल पटेल यांच्या पुढाकारातून आयोजन; दिग्गज नेत्यांची मांदियाळी आणि भाविकांची अलोट गर्दी
गोंदिया : स्थानिक डी.बी. सायन्स कॉलेज परिसरात आयोजित ‘हनुमंत कथे’च्या दुसऱ्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी व्यासपीठावर जाऊन पूज्य रितेश्वर महाराज यांचे आशीर्वाद घेतले आणि हनुमंत कथेच्या श्रवणाचा लाभ घेतला. खासदार प्रफुल पटेल आणि त्यांच्या पत्नी वर्षा पटेल यांच्या विशेष पुढाकारातून या भव्य कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गोंदियातील बिरसी विमानतळावर आगमन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम आणि इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
हनुमंत कथेच्या या मंगलमय प्रसंगी आयोजक खासदार प्रफुल पटेल व सौ. वर्षा पटेल, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. परिणय फुके, विनोद अग्रवाल, संजय पुराम, राजु कारेमोरे, जिल्हा परिषद अध्यक्षलायकराम भेंडारकर, माजी आमदार राजेंद्र जैन आदी उपस्थित होते.
श्री रितेश्वर महाराजांच्या रसाळ वाणीतून हनुमंत कथेचे श्रवण करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे या सोहळ्याची शोभा अधिकच वाढली. “अध्यात्म आणि भक्तीच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा मिळते,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हनुमंत कथा आयोजन समितीचे सदस्य आणि स्वयंसेवक अहोरात्र परिश्रम घेत आहेत. या आध्यात्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण गोंदिया शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.



