गडचिरोलीविदर्भ

दुर्गम भागातील ‘भरीटोला’ गावात सलग १५ वर्षांपासून दारूविक्रीबंदी

गडचिरोली : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दुर्गम कोरची तालुक्यातील भरीटोला या गावाने व्यसनमुक्तीच्या लढ्यात यश मिळविले आहे. ग्रामस्थांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे मागील १५ वर्षांपासून या गावात अवैध दारूविक्री पूर्णतः बंद असून, हे गाव आता विकासाच्या वाटेवर वाटचाल करत आहे.

भरीटोला गावाची लोकसंख्या अवघी २५८ आहे. काही वर्षांपूर्वी गावात दारूविक्रीमुळे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला होता. तरुणांमधील वाढते व्यसन, खालावलेले आरोग्य आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी एकत्र येत दारूविक्रीबंदीचा निर्णय घेतला.या मोहिमेत सक्रिय कार्यकर्ता लक्ष्मण मडावी, काशिनाथ दरवडे, प्रकाश होळी, ग्रा.प. सदस्य अरविंद होळी, देवलाल मडावी, दीपक होळी, गोपाल मडावी, सविता दरवडे, ललेश्वरी मडावी यांच्यासह संपूर्ण गावाने पुढाकार घेतला. दारूविक्रीबंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी ‘मुक्तीपथ’ चमूने ग्रामस्थांना सातत्याने मार्गदर्शन केले. अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरोधात ग्रामस्थांनी अहिंसक कृती केली, ज्याला पोलीस प्रशासनाचेही मोलाचे सहकार्य लाभले.

दारूविक्रीबंदीमुळे भांडण-तंटे कमी झाले असून गावात एकोप्याचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यसनावरील खर्च थांबल्याने नागरिक आता शेती आणि इतर विकासात्मक कामांकडे लक्ष देत आहेत. केवळ दारूविक्रीबंदी करून न थांबता, ज्यांना दारूचे व्यसन जडले होते, त्यांच्यासाठी गावातच व्यसन उपचार शिबिरे राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणले गेले. आज १५ वर्षांनंतरही ही बंदी कायम ठेवून भरीटोला गावाने एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. भरीटोला गावाचा हा निर्णय लोकहितार्थ ठरला आहे. इतर गावांनीही या छोट्याशा गावाचा आदर्श घेऊन आपले गाव दारूमुक्त करावे, असे आवाहन मुक्तीपथ चमूने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button