गोंदियाविदर्भ

प्रशासनाने थांबविला १८ वर्षीय मुलाचा बालविवाह 

गोपनीय माहिती मिळताच संयुक्त पथकाचा छापा; २१ वर्षांखालील विवाहावर कायद्याचा बडगा

गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील पुरगाव (हरिजन टोली) येथे लावला जाणारा एक बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे वेळेत थांबवण्यात आला आहे. लग्नासाठी वराचे (नवरदेवाचे) वय कायद्यानुसार २१ वर्षे पूर्ण असणे अनिवार्य असताना, केवळ १८ वर्षांच्या तरुणाचा विवाह लावला जात असल्याची माहिती मिळताच पोलीस आणि बाल संरक्षण कक्षाने ही मोठी कारवाई केली.

पुरगाव येथे बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस प्रशासनाला प्राप्त झाली होती. या माहितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा आर. मोरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली एक संयुक्त पथक तयार करण्यात आले. यामध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्ष, दामिनी पथक, चाइल्ड हेल्पलाईन आणि इंडियन सोशल वेलफेअर सोसायटीच्या प्रतिनिधींचा समावेश होता. पथकाने घटनास्थळी पोहोचून ग्रामसेवकांकडून वर आणि वधूचे जन्म प्रमाणपत्र प्राप्त केले. तपासणीअंती असे निष्पन्न झाले की, मुलाचे वय १८ वर्षे २ महिने १५ दिवस आहे. ‘बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६’ नुसार मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. मुलाचे वय कायदेशीर मर्यादेपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट होताच, पथकाने विवाह सोहळा थांबवून नवरदेव, नवरी आणि त्यांच्या पालकांना ताब्यात घेतले.

केवळ कारवाई न करता, पथकाने दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन केले. बालविवाहामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि आरोग्यविषयक दुष्परिणाम त्यांना समजावून सांगण्यात आले. यानंतर, “मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय आम्ही विवाह करणार नाही,” असे लेखी हमीपत्र व संमतीपत्र पालकांकडून लिहून घेण्यात आले.

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी करण्यात आली. या मोहिमेत इंडियन सोशल वेलफेअर सोसायटीचे जिल्हा समन्वयक (Access to Justice) ज्ञानेश्वर पटले, धर्मेंद्र भेलावे, अजय खोब्रागडे, अमित बेलेकर, पुजा अनकर, दामिनी पथकाचे प्रशांत बन्सोड, वैशाली भांडारकर, सुवर्णा मडावी, सोनाली टिके तसेच गोंदिया पोलीस स्टेशनचे भागवत दसरिया व राजू नागदेवे सहभागी होते.

बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून, असा प्रकार आढळल्यास नागरिकांनी तातडीने पोलीस किंवा चाइल्ड हेल्पलाईनला कळवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे एका अल्पवयीन मुला-मुलीचे भविष्य अंधारात जाण्यापासून वाचले असून, जिल्ह्यात या कारवाईची मोठी चर्चा होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button